मोहितेवाडी-चिंचोशी रस्त्याचे ‘तीन तेरा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 10:51 PM2018-08-30T22:51:47+5:302018-08-30T22:52:31+5:30
जिल्ह्यात रस्त्यांची अवस्था वाईट : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे होतेय दुर्लक्ष
शेलपिंपळगाव : खेड तालुक्याच्या पूर्व भागातील मोहितेवाडी ते चिंचोशी रस्त्याचे ‘तीन तेरा’ झाले असून, संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला असून, अपघातास निमंत्रण देत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले मोठ मोठे खड्डे अपघातांना निमंत्रण देत असून, वाहन चालविणे जिकिरीचे बनत चालले आहे. रस्त्याच्या दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होत असलेल्या दिरंगाईबाबत ग्रामस्थांमध्ये कमालीची नाराजी पसरलेली आहे.
चाकण-शिक्रापूर राज्य महामार्गाहून मोहितेवाडीमार्गे चिंचोशी, केंदूर, पाबळ आदी गावांकडे येणारे असंख्य प्रवासी ये-जा करण्यासाठी या रस्त्याचा वापर करीत आहेत. तर कनेरसर येथील येमाई मातेच्या दर्शनासाठी येणारे असंख्य भाविकही याच मार्गावरून प्रवास करीत असतात; परंतु गेल्या अनेक दिवसांपासून हा रस्ता पूर्णपणे नादुरुस्त झाला असून खड्डे पसरले आहेत. अनेक ठिकाणी मोठमोठे जीवघेणे खड्डे असल्याने रस्ता आहे की पायवाट, असा प्रश्न वाहनचालकांना पडत आहे; तसेच पावसाच्या पाण्याने या खड्ड्यांमध्ये डबके साचते.
सार्वजनिक बांधकाम विभागाने आम्हा नागरिकांची; तसेच अन्य प्रवाशांची दळणवळणाची समस्या लक्षात घेऊन या नादुरुस्त रस्त्याचे काम तत्काळ मार्गी लावण्याची मागणी सरपंच विद्या मोहिते, उपसरपंच अनिल पोतले, माजी उपसरपंच शरद मोहिते, संचालक संजय मोहिते, ग्रामपंचायत सदस्या सुनीता मोहिते, सागर पोतले, संदीप मोहिते, विविध कार्यकारी विकास सोसायटीचे अध्यक्ष शरदचंद्र मोहिते, संचालक विलास मोहिते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सयाजीराजे मोहिते, किसन पोतले, संजय हैबती मोहिते, अशोक मोहिते आदीसह अन्य स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मोहितेवाडी ते चिंचोशी हा रस्ता नादुरुस्त अवस्थेत आहे. त्यामुळे विद्यार्थी, प्रवासी, भाविक, नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करून मार्गस्थ व्हावे लागत आहे. रस्तेदुरुस्ती विभाग रस्त्याच्या दुरुस्ती कामाकडे दुर्लक्ष करीत आहे. रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजविणे गरजेचे आहे.
- विलास मोहिते, ग्रामस्थ मोहितेवाडी.