औंध जिल्हा रुग्णालयात तीन वर्षांत तीन हजार बाळांचा जन्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:12 AM2021-03-10T04:12:25+5:302021-03-10T04:12:25+5:30
पुणे : अलीकडच्या काही वर्षात लठ्ठ मुले जन्माला येण्याचे प्रमाण वाढले आहे. गर्भवती महिलांमधील आहाराचे अतिरिक्त प्रमाण, मधुमेहासारखे विकार ...
पुणे : अलीकडच्या काही वर्षात लठ्ठ मुले जन्माला येण्याचे प्रमाण वाढले आहे. गर्भवती महिलांमधील आहाराचे अतिरिक्त प्रमाण, मधुमेहासारखे विकार याची परिणती जन्मजात अर्भकाच्या लठ्ठपणामध्ये होते. साधारण चार किलोपेक्षा जास्त वजनाचे बाळ जन्माला आल्यास ते लठ्ठ समजले जाते. औंध जिल्हा रुग्णालयात गेल्या तीन वर्षांमध्ये केवळ एकाच बाळाचे वजन ४ किलोपेक्षा जास्त असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात लठ्ठ मुलांचे प्रमाण जास्त असल्याचे पाहायला मिळत आहे.
औंध जिल्हा रुग्णालयात गेल्या तीन वर्षांमध्ये सर्वसाधारण वजनाची बाळे जन्माला आली आहेत. मागील तीन वर्षांमध्ये रुग्णालयात २९४९ बाळांचा जन्म झाला. त्यापैकी २०२० मध्ये केवळ एका बाळाचे वजन ४ किलोपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात आले. गर्भावस्थेदरम्यान वेळच्या वेळी सर्व तपासण्या केल्यास, मधुमेहाचे निदान झाल्यास त्यावेळी योग्य उपचार केल्यास प्रसूतीच्या दृष्टीने सर्व खबरदारी आधीपासून घेता येते, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांनी सांगितले. जिल्हा रुग्णालयात गर्भवती महिलांना वेळच्या वेळी तपासण्या, पोषण आहार यांचे महत्व समजावून सांगितले जाते. बाळाचे वजन सरासरीपेक्षा जास्त किंवा कमी भरल्यास माता आणि बाळाला डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवले जाते.
-----------------
जिल्हा रुग्णालयात २०१८ मध्ये जन्मलेली एकूण मुले - १०३८
मुले - ५६५
मुली - ४७३
चार किलोंपेक्षा जास्त वजनाची एकूण मुले - ०
------------------
जिल्हा रुग्णालयात २०१९ मध्ये जन्मलेली एकूण मुले - ९२१
मुले - ५०३
मुली - ४१८
चार किलोंपेक्षा जास्त वजनाची एकूण मुले - ०
----------------
जिल्हा रुग्णालयात २०२० मध्ये जन्मलेली एकूण मुले - ९९०
मुलगा - ५१३
मुलगी - ४७७
चार किलोंपेक्षा जास्त वजनाची एकूण मुले - १
-------------------
३) शहरी मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण अधिक
ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागातील मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण अधिक असल्याचे मत बालरोगतज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. महिलांमधील अतिरिक्त आहार, बदलती जीवनशैली, मधुमेहासारखे विकार यामुळे जन्मजात अर्भकांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढते. गर्भधारणेच्या काळात जास्त आहार घेतल्यासही बाळांचे वजन वाढू शकते.
-----------------------
बाळांमधील लठ्ठपणाची कारणे :
- स्थूल माता
- मधुमेहासारखे विकार
- प्रसूती नऊ दिवस नऊ महिन्यांच्या पुढे जाणे
- गर्भधारणेच्या दरम्यान जास्त वजन वाढणे
------------------------
ग्रामीण भागात गर्भवती महिलांच्या पोषण आहाराबाबत पुरेशी जागरुकता पहायला मिळत नाही. त्यामुळे बाळांमध्ये लठ्ठपणाचे कमी प्रमाण पाहायला मिळते. गर्भावस्थेदरम्यान विविध तपासण्या नियमितपणे करण्याचा सल्ला दिला जातो. त्यावेळी अर्भकाच्या वजनाचाही अंदाज येतो. स्थूल महिलांमध्ये मधुमेह आढळून आला किंवा गर्भावस्थेमध्ये मधुमेहाचे निदान झाले, प्रसूतीचे दिवस उलटून गेले किंवा गर्भावस्थेत जास्त वजन वाढले तर जन्मजात बाळामध्ये लठ्ठपणा पाहायला मिळतो.
- डॉ. नीलम दीक्षित, प्रसूती विभाग प्रमुख, औंध जिल्हा रुग्णालय