जिल्ह्यात एका दिवसात तीन हजार नोंदी काढल्या निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:13 AM2021-09-10T04:13:52+5:302021-09-10T04:13:52+5:30
पुणे: सर्वसामान्य नागरिकांना साध्या नोंदीसाठी तलाठी, सर्कल अधिकारी यांच्याकडे वारंवार हेलपाटे घालावे लागतात. परंतु, पुणे जिल्ह्यात घेण्यात आलेल्या फेरफार ...
पुणे: सर्वसामान्य नागरिकांना साध्या नोंदीसाठी तलाठी, सर्कल अधिकारी यांच्याकडे वारंवार हेलपाटे घालावे लागतात. परंतु, पुणे जिल्ह्यात घेण्यात आलेल्या फेरफार अदालतमध्ये एकाच दिवसात तब्बल २ हजार ९४१ फेरफार नोंदी निकाली काढण्यात आल्या असल्याची माहिती तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी दिली.
महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्यासाठी महाराजस्व अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. ई- फेरफार प्रणालीमध्ये एक महिन्याच्या वरील प्रलंबित नोंदी निर्गत करण्यासाठी दर महिन्याचा दुसऱ्या बुधवारी या कालावधीत महसूल मुख्यालयात फेरफार अदालती घेण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निर्देश दिले आहेत.
आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशानुसार, कोविड-19 बाबतच्या नियमांचे पालन करून पुणे जिल्ह्यात माहे सप्टेंबर 2021 च्या दुसऱ्या बुधवारी, दि. ८ सप्टेंबर रोजी फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. फेरफार अदालतीस अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला असून सदर फेरफार अदालतीमध्ये साध्या २हजार २१७, वारस- ५४५ तक्रारी -१७९ अशा एकूण २ हजार ९४१ फेरफार नोंदी निर्गत करण्यात आल्या आहेत.
-------
तालुकानिहाय फेरफार नोंदी निर्गत
हवेली 216, पुणे शहर 0, पिंपरी चिंचवड 90, शिरुर 367, आंबेगाव 144, जुन्नर 362, बारामती 392, इंदापूर 313, मावळ 0, मुळशी 94, भोर 102, वेल्हा 48, दौंड 340, पुरंदर 171, खेड 302 अशा एकूण 2 हजार 941