तीन हजार आयटी शिक्षक अधांतरी
By admin | Published: January 24, 2017 01:49 AM2017-01-24T01:49:35+5:302017-01-24T01:49:35+5:30
राज्यातील माध्यमिक शाळेत शिक्षण संचालनालय विभागातर्फे संगणकीय अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे. मात्र, आयसीटीचा
बारामती : राज्यातील माध्यमिक शाळेत शिक्षण संचालनालय विभागातर्फे संगणकीय अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे. मात्र, आयसीटीचा ठेका संपल्याने संगणक शिक्षकांच्यावर बेरोजगार होण्याची पाळी आली आहे. मोठी गुंतवणूक केलेल्या आयसीटी लॅब धूळ खात पडून राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. डिजिटल इंडियाच्या काळात ३ हजार शिक्षकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे.
केंद्र पुरस्कृत आयसीटी योजना सरकारने सन २००८-०९ या सालापासून अनुदानित माध्यमिक शाळामध्ये सुरू केली. राज्यांमध्ये ८००० संगणक कक्ष तयार केले. या योजनेत एका कक्षासाठी १२.५ लाख खर्च शासनाने केला. यामध्ये १० संगणक संच, यूपीएस, ओव्हरहेड प्रोजेक्टर आणि इतर साहित्य मोफत पुरवले. शिक्षकांना प्रशिक्षणही देण्यात आले होते. ३००० शिक्षकांचा गेल्या चार महिन्यांपासून ठेका संपल्याने बेरोजगारांचा प्रश्न उभा राहिला आहे. उर्वरित पाच हजार शिक्षकांच्यावरही बेकारीची टांगती तलवार आहे.
याबाबत शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. नुकतीच संघटनेचे पदाधिकारी उदय भट, जीवन सुरूडे, अमोल दिघे, लक्ष्मण डांगे यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली. संगणक शिक्षकांचे काम करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. याबाबत अधिकाऱ्यांना सूचनादेखील दिल्या आहेत. लवकरच त्यासंदर्भात अधिकृत घोषणा केली जाईल, असे आश्वासन तावडे यांनी दिले आहे. (प्रतिनिधी)