कात्रज उद्यानाच्या स्वच्छतेचे तीनतेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 02:16 AM2018-10-03T02:16:09+5:302018-10-03T02:16:42+5:30
राजीव गांधी प्राणिसंग्रहालय : दारूच्या बाटल्या, फुटके पाईप; भटक्या कुत्र्यांचा वावर
प्रिती जाधव-ओझा
पुणे : एकीकडे संपूर्ण देशभर स्वच्छता अभियान राबवून शहरेच्या शहरे नव्या जोमाने कामाला लागली आहेत. त्याचबरोबर राज्य शासन, केंद्र सरकारही यासाठी करोडो रुपये खर्च करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. मात्र, राजीव गांधी प्राणिसंग्रहालयालगत असलेल्या स्वच्छतागृहांचे मात्र याउलट चित्र पाहावयास मिळत असून, पालिकेच्या स्वच्छतागृहांची बिकट अवस्था झाली आहे.
सातारा रस्त्यावरील सर्वपरिचित असलेल्या राजीव गांधी प्राणिसंग्रहालय या पर्यटनस्थळाला पर्यटकांची मोठी पसंती असल्याने तेथे दर वर्षी लाखो पर्यटक येतात. परंतु, संग्रहालयाजवळ असलेल्या महापालिकेच्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची देखभाल केली जात नसल्याचे वास्तव चित्र असून, तेथे दुर्गंधीचे व घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. केवळ देखभाल-दुरुस्तीअभावी येथील सार्वजनिक स्वच्छतागृहाची मोठी दुरवस्था झाली असून पर्यटकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सार्वजनिक स्वच्छता हे सार्वजनिक आरोग्याचे एक महत्त्वाचे अंग आहे. या प्रेक्षणीय स्थळावर पर्यटकांसाठी महापालिकेचा गाडीतळ आहे. त्यालागतच पुरुष व महिलांसाठी स्वच्छतागृहदेखील आहे. पालिकेने बांधलेली ही शौचालये रिकाम्या काचेच्या बाटल्या व तुटलेले पाईप या अस्वच्छतेच्या विळख्यात वेढली गेली आहेत. येथील स्वछतागृहामध्ये भटक्या कुत्र्यांचे साम्राज्य असते. रात्रीच्या काळोखात ही भटकी कुत्री एखाद्या पर्यटकावर हल्ला करतील की काय, या भीतीमुळे पर्यटक या शौचालयांचा वापर करण्याचे टाळतात. ही दोन्ही शौचालये वापरासाठी सुरक्षित म्हणजे यांच्या स्वच्छतागृहातील लाईटचे दिवे लावण्यात यावेत, जेणेकरून जनावरांचा धोका टाळता येईल, अशी मागणी पर्यटकांकडून होत आहे.
स्वच्छतागृहांची अवस्था
1 अपुऱ्या स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था, पुरेशा स्वच्छतेचा अभाव शहर व उपनगरामध्ये असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. स्वच्छतागृह नाही, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरुस्ती महापालिकेने करणे गरजेचे आहे. यासाठी महापालिकेचे कर्मचारी ही स्वच्छतागृहे पर्यटकांसाठी सुरक्षित व वापरण्यायोग्य करणार का, असा प्रश्न येथे येणारे पर्यटक विचारत आहेत.
2 या ठिकाणी असलेल्या स्वच्छतागृहांची संख्या अपुरी आणि अस्तित्वात असलेल्या स्वच्छतागृहांची स्वच्छता व्यवस्थित होताना दिसत नाही. हात धुण्यासाठी असलेल्या वॉशबेसिनचे पाईप तुटलेल्या अवस्थेत असून त्याचे पाणी खाली जमिनीवर पडत असल्याने पाय घसरून पडल्याचे अनेकांनी सांगितले. लघुशंका करण्यासाठी गेल्यानंतर तेथे पाणी सोडण्याची सुविधा नसल्याचेही आढळून आले. त्यामुळे या परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरल्याचे आढळून आले आहे.