पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात; कार जळून खाक, तिघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 03:12 PM2024-02-17T15:12:32+5:302024-02-17T15:14:02+5:30
कारमधील तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला...
निरगुडसर (पुणे) : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचरच्या दक्षिण बाजूला तीन किलोमीटर अंतरावर भोररवाडी तांबडे मळा (तालुका आंबेगाव) येथे आज सकाळी स्विफ्ट कार, टेम्पो व कंटेनरचा विचित्र अपघात झाला. या भीषण अपघातात स्विफ्ट कार जागीच जळून खाक झाली. कारमधील तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
सुदैवाने स्विफ्ट कारचा चालक व टेम्पोच्या चालक बचावला आहे. मृत झालेले तीन तरुण खेड तालुक्यातील राक्षेवाडी येथील असल्याची माहिती प्राप्त होत आहे. अपघातानंतर या परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मंचरपासून जवळच असणाऱ्या भोरवाडी परिसरात पुणे - नाशिक महामार्गावर पुण्याच्या दिशेने जाणारा एक कंटेनर (GJ 01 WB 1737) बंद अवस्थेत उभा होता. त्याच ठिकाणी आज सकाळी टेम्पो (MH 12 QG 3351) व स्विफ्ट कार (MH 14 DT 0295) यांच्यात जोरदार धडक झाली.
धडक झाल्यानंतर टेम्पो पुढे जाऊन उभ्या असलेल्या कंटेनरला धडकला तर स्विफ्ट गाडीने पेट घेतला. त्यात स्विफ्ट गाडी पूर्णतः जळून खाक झाली आहे. या अपघातात स्विफ्ट गाडीतील तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सुदैवाने स्विफ्ट कारचा चालक व टेम्पो चालक बचावले आहेत. मृत झालेल्या व्यक्तींचा तपशील अद्याप प्राप्त झालेला नाही. मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे पोलीस उपनिरीक्षक सोमेश्वर शेटे पोलीस नाईक राजेंद्र हिले, नंदकुमार आढारीयंत्रणा याबाबत कसून चौकशी करत आहेत.