कोयता, चाकू व रॉडने वार करून खून केल्याप्रकरणी तिघे जण ४८ तासांच्या आत जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 12:47 PM2021-01-30T12:47:37+5:302021-01-30T12:49:34+5:30
भरदिवसा कोयता, चाकू व रॉडने क्रूर पद्धतीने मारहाण खुन करून आरोपी फरार झालेले होते
लोणी काळभोर : पुणे - सासवड राज्यमार्गावर भरदिवसा कोयता, चाकू व रॉडने वार करून फरार झालेल्या खून प्रकरणातील तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने ४८ तासांच्या आत जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.
तुषार खंडु चव्हाण वय २१ ( रा.वडकी, गायदरा ता.हवेली ) याचा खून झाला आहे. याप्रकरणी अमोल उर्फ पप्या विष्णू जाधव ( वय ३० ), अमित उर्फ दत्ता विष्णू जाधव ( वय ३३ ) व कालीदास उर्फ सागर मल्हारी जाधव ( वय २७, सर्व रा. गायदरा, वडकी, ता.हवेली ) यांना अटक करण्यात आली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार ( २७ जानेवारी ) रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारांस पुणे - सासवड राज्यमार्गावरील वडकी ( ता हवेली ) येथील हिंदवी स्नॅक्स येथे तुषार चव्हाण व त्याचा मित्र फिर्यादी शुभम बापु पवार ( वय २१, रा. वडकीनाला, ता. हवेली ) हे चहा पित बसले असताना अमोल, अमित, कालीदास जाधव व एक अनोळखी हे दोन दुचाकी वरून तेथे पोहोचले. व जुन्या घरगुती भांडणाचे कारणावरून चिडुन त्यांनी शुभम यास पाठीमागुन धरून पोटाला चाकू लावून जीवे मारण्याची धमकी देवुन यातील इतर तिघांनी तुषार याचे डोक्यात व पोटावर कोयता, लोखंडी राॅड व चाकुने क्रूर पद्धतीने वार करून त्याचा खुन करून ते दुचाकीवरून हडपसर बाजूकडे पळून गेले.
भरदिवसा कोयता, चाकू व रॉडने क्रूर पद्धतीने मारहाण खुन करून आरोपी फरार झालेले होते. गुन्हयाचा समांतर तपास करणेसाठी पोलीस निरीक्षक घनवट यांना स्थानिक गुन्हे शाखेचे वेगळे पथक नेमणे बाबत आदेश दिले होते. त्याप्रमाणे तपासासाठी लोणीकाळभोर पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके नेमण्यात आली होती.
पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली नेमलेले पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरु गायकवाड, राजेंद्र थोरात, मुकुंद आयाचीत, राजेंद्र पुणेकर, प्रसन्न घाडगे, समाधान नाईकनवरे या पथकाने घटनास्थळी भेट देवून गुन्हयाची माहिती घेऊन तपासाला सुरुवात केली होती. त्याप्रमाणे आजूबाजूचे गावातील सीसीटीव्ही फुटेज पडताळणी केली. आरोपीचा जाणे येण्याचा मार्ग याबाबत स्थानिक गावकऱ्यांकडे चौकशी केली होती. त्यातूनच गुन्हे शाखेचे पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरुन गुन्हयातील वरील तिघांना आळंदी फाटा, लोणीकंद ( ता हवेली ) येथे साध्या वेशात सापळा रचून ताब्यात घेतले आहे. त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याचे सांगून गुन्हा करताना त्यांचेसोबत मंगेश बाळासाहेब चव्हाण ( रा. नांदोशी ता.हवेली. सध्या राहणार भेकराईनगर हडपसर पुणे ) हा असल्याचे सांगितले आहे.
या तिघांना पुढील तपासासाठी लोणी काळभोर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. यातील आरोपी मंगेश चव्हाण हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी हवेली पोलीस स्टेशनला खुनाचा प्रयत्नाचा गंभीर गुन्हा दाखल आहे.