स्वाईन फ्लूने महिनाभरात तीन महिलांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 08:50 PM2018-08-23T20:50:08+5:302018-08-23T20:51:28+5:30
स्वाईनफ्लूची बाधा झाल्याच्या संशयावरुन या महिन्यात गुरुवार अखेरीस (दि. २३) ३ हजार २५८ जणांची तपासणी करण्यात आली.
पुणे : स्वाईन फ्लूने गेल्या तीन आठवड्यात तीन महिलांचामृत्यू झाला असून, ११ जण व्हेंटीलेटरवर असल्याची माहिती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. यातील दोन महिला शहरातील असून, एक महिला मूळची उस्मानाबादची आहे.
वैशाली कांदेकर (वय ३६, मूळ रा. नवीन वसती, येवती, उस्मानाबाद ) यांचा ३ आॅगस्टला, वैजयंती बाळासाहेब साबळे (वय ६०, रा. मॉडेल कॉलनी शिवाजीनगर) यांचा १९ आॅगस्टला आणि आशा अजय अगरवाल (वय ५५, अगरवाल गार्डन, हडपसर) यांचा २१ आॅगस्टरोजी खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.
स्वाईनफ्लूची बाधा झाल्याच्या संशयावरुन या महिन्यात गुरुवार अखेरीस (दि. २३) ३ हजार २५८ जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील ३४ जणांना टॅमी फ्लू औषध देण्यात आले. तर ५ जणांच्या घशातील द्रव पदार्थाची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. त्यातील ४ जणांना स्वाईन फ्लूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. विविध रुग्णालयात अजूनही १५ जण स्वाईन फ्लूवर उपचार घेत आहेत. त्यातील ११ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर, जानेवारी २०१८ पासून स्वाईन फ्लूच्या संशयावरुन ५ लाख ६१ हजार ८१७ जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील ५ हजार ३७४ जणांना टॅमी फ्लू औषध देण्यात आले. त्यातील आठशे रुग्णांच्या घशातील द्रव पदार्थाची तपासणी करण्यात आली असून, यातील ३६ रुग्णांना स्वाईन फ्लू असल्याचे स्पष्ट झाले.