‘मसाप’च्या सहा कार्यवाहपदी तीन महिलांची वर्णी
By श्रीकिशन काळे | Published: March 29, 2024 04:39 PM2024-03-29T16:39:14+5:302024-03-29T16:39:47+5:30
६ कार्यवाहांपैकी २ कार्यवाहांची पदे आणि एक शहरप्रतिनिधींचे पद यावर महिलांची निवड झाल्यामुळे त्यांचा कार्यकारी मंडळातील सहभाग वाढला
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पदाधिकार्यांच्या आणि प्रतिनिधींच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागा कार्यकारी मंडळाच्या शुक्रवारी (दि.२९) झालेल्या बैठकीत भरण्यात आल्या. परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार व जिल्हा प्रतिनिधी उपलब्ध होते. सहा कार्यवाहांपैकी तीन पदांवर महिलांची वर्णी लागली आहे.
प्रा. जोशी म्हणाले, मसापचे तीन पदाधिकाऱ्यांच्या जागा रिक्त झाल्याने त्या भरण्याचा विषय कार्यकारी मंडळाच्या बैठकीच्या विषय पत्रिकेवर घेण्यात आला. घटनेतील तरतूदीनुसार आणि घटनेने कार्यकारी मंडळाला दिलेल्या अधिकारानुसार या रिक्त जागा भरल्या.
प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पदावर सुनिताराजे पवार यांची निवड झाल्यामुळे त्या काम करत असलेले कोषाध्यक्षपद रिक्त झाले होते. कोषाध्यक्षपदी सातारा जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी यांची, तर स्थानिक कार्यवाह दीपक करंदीकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पुणे शहर प्रतिनिधी शिरीष चिटणीस यांची निवड केली. स्थानिक कार्यवाहपदी ज्येष्ठ कवयित्री अंजली कुलकर्णी, कवयित्री मृणालिनी कानिटकर यांची निवड केली. पुणे शहर प्रतिनिधी म्हणून लेखक डॉ. आशुतोष जावडेकर, ज्येष्ठ कवयित्री ज्योत्स्ना चांदगुडे यांची निवड झाली. या निवडींमुळे ६ कार्यवाहांपैकी २ कार्यवाहांची पदे आणि एक शहरप्रतिनिधींचे पद यावर महिलांची निवड झाल्यामुळे त्यांचा कार्यकारी मंडळातील सहभाग वाढला आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळावर साहित्य परिषदेचे तिसरे प्रतिनिधी म्हणून राजन लाखे यांची १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीसाठी बहुमताने निवड करण्यात आली. याच कालावधी साठी जयंत येलुलकर व जे. जे. कुळकर्णी यांची विभागीय कार्यवाह म्हणून निवड करण्यात आली आहे असे प्रा. जोशी यांनी स्पष्ट केले.
बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय
-परिषदेचे विभागीय साहित्य संमेलन होणार वारणानगरला
-युवा साहित्य नाट्य संमेलन होणार नगरला
-समीक्षा संमेलन होणार पुण्यात. शाखा मेळावा पंढरपूर येथे.