अकराव्या मजल्यावरून पडून ३ कामगारांचा मृत्यू, दत्तवाडीतील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 03:09 AM2017-10-18T03:09:34+5:302017-10-18T03:09:44+5:30
सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानासमोर सुरू असलेल्या बांधकामाच्या अकराव्या मजल्याच्या स्लॅबचे सेंट्रिंग कोसळून तीन कामगारांचा मृत्यू झाला, तर एक कामगार गंभीर जखमी झाला.
पुणे : सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानासमोर सुरू असलेल्या बांधकामाच्या अकराव्या मजल्याच्या स्लॅबचे सेंट्रिंग कोसळून तीन कामगारांचा मृत्यू झाला, तर एक कामगार गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी सकाळी नऊ ते सव्वानऊच्या सुमारास घडली. यातील जखमी कामगाराची प्रकृती चिंताजनक आहे. ठेकेदार अंगद पांचाळ याला अटक केली आहे. बुधवारी दिवाळी सुटीनिमित्त गावी जाण्यासाठी कामगार मंगळवारीच कामावर आले होते.
प्रकाशकुमार बिडासाव गुप्ता (वय ३०, रा. बेरोकाला, जि. हजारीबाग, झारखंड), दुलारीचंद्र रामेश्वर राम (वय ३७, रा. चंदनगुडी, जि. हजारीबाग, झारखंड), मिथुन भरत सिंग (वय २०, रा. डुमका, जि. बोट्टा, झारखंड) अशी मृत कामगारांची नावे आहेत, तर रामेश्वर रूपलाल दास (वय २४, रा. बरकठ्ठा, जि. हजारीबाग, झारखंड) असे जखमी कामगाराचे नाव आहे. सिंहगड रस्त्यावर पाटे डेव्हलपर्स यांचा बांधकाम प्रकल्प सुरू आहे. मंगळवारी सकाळी नऊ-सव्वानऊच्या सुमारास अकराव्या मजल्यावरील स्लॅबची सेंट्रिंग कोसळली. पीलरला लाकडी प्लेटा लावताना हा प्रकार घडला. या वेळी चार कामगार तेथे काम करीत होते. त्यापैकी तीन कामगार थेट अकराव्या मजल्यावरून खाली कोसळले. त्यापैकी प्रकाशकुमार या कामगाराचा जागेवरच मृत्यू झाला, तर उर्वरित दोघे रुग्णालयात उपचार घेताना दगावले. चौथा कामगार दहाव्या मजल्यावरून पडताना आश्चर्यकारकरीत्या तिसºया मजल्यावरील सदनिकेच्या आतल्या बाजूला पडला. यामुळे त्याचा जीव वाचला, मात्र तो गंभीर जखमी झाला असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दत्तवाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी दिली.
गावी जाण्यासाठी सकाळीच कामावर
दिवाळीच्या सुटीनिमित्त कामगार बुधवारी त्यांच्या मूळ गावी जाणार होते. यामुळे काम लवकर संपवण्यासाठी ते चौघेही सकाळी आठच्या सुमारास प्रकल्पावर आले होते. प्रकल्पावरील इतर २५ कामगार मात्र काम संपवून खाली उतरले होते. ऐन दिवाळीत ही घटना घडल्याने कामगारवर्गातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दिवाळी रविवारपर्यंत प्रकल्पाचे काम बंद आहे. मात्र ठेकेदाराला व कामगारांनाही सुटीत गावाला जायचे असल्याने उरलेले काम पूर्ण करण्यासाठी ते कामावर आले होते. त्याची कोणत्याही प्रकारची कल्पना आम्हाला दिली नव्हती. घटना घडल्यावर आम्हाला याची माहिती झाली. ठेकेदारानेही काम करताना सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली होती. मात्र सुरक्षा जाळीवर एकाच वेळी चौघे पडल्याने ती तुटून ही दुर्घटना घडली. यासंदर्भात आम्ही पोलिसांना पूर्ण सहकार्य करीत असून जखमी कामगाराच्या उपचारासाठी, तसेच मृत व्यक्तींच्या घरच्यांना आर्थिक मदतीसाठी सहकार्य करणार आहोत.
- प्रमोद वाणी,
पाटे डेव्हलपर्स