विकृतीचा कळस! फुटपाथवर झोपलेल्या तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 10:10 PM2019-08-27T22:10:28+5:302019-08-27T22:40:52+5:30
बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मालधक्का चौकात फुटपाथवर झोपलेल्या कुटुंबाच्या एका ३ वर्षाच्या मुलीला एकाने उचलून नेले़.
पुणे : फुटपाथवर झोपलेल्या ३ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. ससून रुग्णालयाच्या मागील बाजूच्या फुटपाथवर हा प्रकार मंगळवारी पहाटे घडला. दरम्यान, रेल्वे पोलीस आणि शहर पोलिसांमध्ये हद्दीच्या वादातून रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मालधक्का चौकात फुटपाथवर झोपलेल्या कुटुंबाच्या एका ३ वर्षांच्या मुलीला एकाने उचलून नेले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून तिचे डोके आपटून खून करण्यात आला. पुणे रेल्वे स्टेशनच्या यार्डात थांबलेल्या एका रेल्वेच्या डब्यात या चिमुरडीला फेकून दिल्याचे आढळून आले.
याबाबत हे कुटुंब सर्वप्रथम रेल्वे पोलिसांकडे गेले होते, मात्र, त्यांनी या कुटुंबीयांची दखल न घेतल्याने ते रेल्वे सुरक्षा दलाकडे गेले. त्यांनी परिसरात शोध घेतल्यावर एका डब्यात ही चिमुरडी आढळून आली. तिच्या चेहऱ्यावर अनेक ठिकाणी चावे घेतल्याचे आढळून आले़. त्यांनी या मुलीला ससून रुग्णालयात आणले. तेथे डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. बंंडगार्डन पोलीस आणि पुणे गुन्हे शाखा यांना याबाबत कोणतीही माहिती मिळाली नव्हती.
पुणे स्टेशन येथील मालधक्का चौकाजवळील भिंतीलगत 40 ते 50 भटक्या व विमुक्त समाजातील कुटुंबे पालांमध्ये वास्तव्य करतात. लिंबू, मिरची, खेळणी विकून उदरनिर्वाह करतात. त्यामध्ये काही जण भिक्षेकरी आहेत. बारामती येथून भटक्या व विमुक्त प्रवर्गातील दाम्पत्य उदरनिर्वाहासाठी पुणे स्टेशन येथे आले होते. संबंधित दाम्पत्य आपल्या अडीच वर्षांच्या मुलीला घेऊन मालधक्क्याजवळील पालांमध्ये वास्तव्य करीत आहे. दरम्यान मंगळवारी पहाटे दाम्पत्य त्यांच्या मुलीला जवळ घेऊन झोपले होते. पहाटे पाच वाजता अनोळखी व्यक्तीने मुलीला उचलून नेले. मुलीच्या आईला जाग आल्यानंतर त्यांनी शोध घेण्यास सुरुवात केली.
दरम्यान, सकाळी सात वाजता लोहमार्ग पोलिसांना पुणे रेल्वे स्थानक परिसरात गस्त घालणाऱ्या लोहमार्ग पोलिसांना रेल्वेच्या डब्यामध्ये मुलगी बेशुद्ध अवस्थेत आढळली. पोलिसांनी तिला उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करुन तिच्या पालकांचा शोध घेतला. मालधक्का चौकात पोलिसांकडून चौकशी करताना मुलीच्या आई-वडिलांनी मुलीचे छायाचित्र ओळखले. मुलीवर उपचार सुरू असताना सायंकाळी साडेपाच वाजता मुलीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.