वस्ताऱ्याने वार करणाऱ्याला तीन वर्षे सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:13 AM2021-03-16T04:13:12+5:302021-03-16T04:13:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : अनैतिक संबंधाच्या संशयावरून वस्तराने गळ्यावर वार करणाऱ्याला न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अनैतिक संबंधाच्या संशयावरून वस्तराने गळ्यावर वार करणाऱ्याला न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
सत्र न्यायाधीश एस.एच.ग्वालानी यांनी हा निकाल दिला आहे. राजू विक्रम मानवतकर (वय ३२, रा. कोथरूड) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत प्रशांत सुरेश जगधने (वय २३, रा. वडगावशेरी) याने फिर्याद दिली आहे. ही घटना २७ जानेवारी २०१८ रोजी रात्री १ वाजून १० मिनिटाच्या सुमारास वडगावशेरी भागात घडली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी काम पाहिले. त्यांनी सात साक्षीदार तपासले. त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक एस. यू. चांदणे यांनी मदत केली. मानवतकर याने घरासमोर उभारलेल्या फिर्यादीला शिवीगाळ केली. महिलेशी शरीरसंबंध का ठेवतो, असे म्हणत वस्तराने वार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चंदननगर पोलिसांनी ३०७ (खुनाचा प्रयत्न) नुसार दोषारोपपत्र दाखल केले. मात्र, न्यायालयाने ३२३ (गंभीर मारहाण) नुसार शिक्षा सुनावली.