कापड दुकान फोडणाऱ्या दोघांना ३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 12:08 AM2018-12-25T00:08:38+5:302018-12-25T00:08:53+5:30
जेजुरी (ता. पुरंदर) येथील कापड दुकान फोडून अडीच लाख रुपयांच्या कपड्यांची चोरी करणा-या परप्रांतीय सख्ख्या भावांना सासवड न्यायालयाने ३ वर्षे सश्रम कारावास व पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
जेजुरी /लोणी काळभोर : जेजुरी (ता. पुरंदर) येथील कापड दुकान फोडून अडीच लाख रुपयांच्या कपड्यांची चोरी करणाºया परप्रांतीय सख्ख्या भावांना सासवड न्यायालयाने ३ वर्षे सश्रम कारावास व पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, की याप्रकरणी नीतेशकुमार खेतारामजी माळी (वय ३६), विक्रमकुमार खेतारामजी माळी (वय ३४, दोघेही रा. डोंबिवली इस्ट, मुंबई, मूळ गाव फालना, ता. बाली, जि. पाली, राजस्थान) या दोघा सख्ख्या भावांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन प्रमुख दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश क्षीरसागर, सहायक फौजदार दत्तात्रय गिरमकर, चंद्रकांत झेंडे, महेश गायकवाड, नीलेश कदम, नितीन गायकवाड, राजू मोमीन, पोपट गायकवाड, अक्षय जावळे, समाधान नाईकनवरे या पोलीस पथकाने जेरबंद केले होते. या दोघांनी केलेले नऊ गुन्हे उघडकीस आले होते. त्यांच्याकडून ११,२२,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
यासंदर्भातील सविस्तर हकिकत अशी : २४ एप्रिल २०१८ रोजी जेजुरी (ता. पुरंदर) येथील शिवानंद हॉटेलशेजारील आर. एन. गारमेंट्स या कपड्यांच्या दुकानाचे शटर उचकटून चोरी झाली होती. अज्ञात चोरट्यांनी शर्ट, पॅन्ट असा २,५२,२०० रुपयांचा माल चोरून नेला होता.
पुणे ग्रामीण जिल्ह्यात अशा प्रकारचे अनेक गुन्हे घडल्याने तत्कालीन पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी या गुन्ह्यांचा तपास स्थानिक गुन्हे शाखेला करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्यांचा तपास सुरू करून गोपनीय माहितीच्या आधारे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे नीतेशकुमार खेतारामजी माळी व विक्रमकुमार खेतारामजी माळी यांना पुणे अहमदनगर रस्त्यावरील वाघोली येथून शेवरोले बीट मोटार (ॠख1 ङऊ ५४०५) यांसह ताब्यात घेतले होते. मोटारीमध्ये १४ पिशव्यांमध्ये नवीन कपडे मिळून आले.
त्याबाबत चौकशी केली असता दोघांनी मिळून जेजुरी व कुंजीरवाडी येथील कपड्यांचे दुकान फोडून चोरी केलेले कपडे असल्याचे सांगितले होते. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता तपासात त्यांनी जेजुरी, लोणी काळभोर, सासवड, यवत, मंचर, आळेफाटा, तळेगाव दाभाडे या भागांत गुन्हे केल्याचे सांगितले होते.
आरोपींना जेजुरी पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातून सासवड पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात वर्ग करण्यात आले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड पोलीस ठाण्यातील हवालदार जे. एम. भोसले, एन. ए. नलवडे यांनी अधिक तपास केला होता.
अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त
आरोपींकडून वरील गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मालापैकी १,९७,५०० चे कपडे व ५,२५,००० रोख रक्कम व ४०,००० रुपये किमतीची शेवरोले चारचाकी गाडी असा एकूण ११,२२,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
सासवड येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्याची सुनावणी होऊन न्यायालयाने या दोन्ही भावांना तीन वर्षे सश्रम कारावास व ५०००० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावास भोगावा लागणार आहे.