तीन वर्षांत पालिकेच्या विमा योजनेचा लाभ अवघ्या ८३ कुटुंबांनाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:11 AM2021-07-07T04:11:33+5:302021-07-07T04:11:33+5:30
पुणे : महापालिकेने मिळकत करदात्या नागरिकांसाठी सुरू केलेल्या पं. दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजनेचा लाभ गेल्या तीन वर्षांत अवघ्या ...
पुणे : महापालिकेने मिळकत करदात्या नागरिकांसाठी सुरू केलेल्या पं. दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजनेचा लाभ गेल्या तीन वर्षांत अवघ्या ८३ कुटुंबांना मिळाला आहे. प्रत्यक्षात पालिकेने साडेसात लाख नागरिकांचा अपघात विमा उतरविलेला आहे. त्यापोटी विमा कंपनीला दरवर्षी चार ते पाच कोटींच्या दरम्यान रक्कम मोजली जाते. शहरात मागील तीन वर्षांत चारशेपेक्षा अधिक लोकांचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्या तुलनेत विम्याचा लाभ मिळालेल्या कुटुंबांची संख्या कमी आहे.
मिळकतकर भरणाऱ्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसदाराला विम्यापोटी पाच लाख रुपये मिळत होते. या योजनेची काही वर्षांपूर्वी पुनर्रचना करण्यात आली आहे. निवासी मिळकतकरधारकांच्या कुटुंबात तो स्वत:, त्याची पत्नी किंवा पती, त्याच्यावर अवलंबून असलेली २३ वर्षांखालील पहिली दोन अविवाहित अपत्ये, मिळकतकर दात्याचे आई व वडील अशांना विम्याची रक्कम देण्याची तरतूद आहे. पालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये यासाठी तरतूद आहे.
मिळकतकरधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला पाच लाख रुपये, तसेच मिळकतकरधारकाच्या पत्नीचा किंवा पतीचा अपघाती मृत्यू झाल्यास पाच लाख रुपये, मिळकतकर धारकावर अवलंबून असलेल्या पहिल्या दोन पाल्यांस अपघाती मृत्यू आल्यास त्याच्या कुटुंबाला मूळ विमा रकमेच्या ५० टक्के म्हणजे दोन लाख पन्नास हजार रुपये, मिळकतधारकाच्या आई किंवा वडिलांचा अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख पन्नास हजार रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. महापालिकेचा निवासी मिळकतकर व गवनी शुल्क भरणाऱ्या करदात्यांना ही योजना लागू आहे.
चौकट
१ एप्रिल २०१९ ते २७ मे २०२० आणि २४ सप्टेंबर २०२० ते आजतागायत या कालावधीमध्ये अनुक्रमे ५१ आणि ५६ असे प्रस्ताव दाखल झाले होते. अपघाती मृत्यू, अपघातात पूर्ण अथवा अंशत: अंपगत्व इत्यादी कारणांसाठी योजनेंतर्गत ७३ कुटुंबांना लाभ देण्यात आला असून उर्वरित ११ प्रकरणे फेटाळण्यात आली आहेत. त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
चौकट
लोकांना माहितीच नाही
लाभार्थ्यांची संख्या मागील दोन वर्षांच्या तुलनेत वाढली आहे. मात्र, योजनेची माहिती लोकांपर्यंत पोचविण्यासाठी पालिकेने मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याची आणि प्रत्येक मिळकतकर दात्यापर्यंत ही माहिती पोहोचविण्याची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे.
चौकट
वर्ष। अपघाती मृत्यू। दाखल दावे। मंजूर प्रस्ताव
सन २०१९ - १८३ - १६ - १६
२०२० - १४५ - ५१ - ४५
२०२१ (मेपर्यंत) - ७५ - ५६ - २८
एकूण - ४०३ - १२३ - ८९