मारहाणप्रकरणी तीन जणांना दोन वर्षांची सक्तमजुरी
By admin | Published: June 10, 2017 01:48 AM2017-06-10T01:48:31+5:302017-06-10T01:48:31+5:30
शेतामध्ये बैलगाडीतून जाताना रस्त्यात अडवून मारहाण केली. तसेच भांडणे सोडविण्यास गेलेल्या व्यक्तींनाही मारहाण करून त्यातील
लोकमत न्यूज नेटवर्क
सासवड : शेतामध्ये बैलगाडीतून जाताना रस्त्यात अडवून मारहाण केली. तसेच भांडणे सोडविण्यास गेलेल्या व्यक्तींनाही मारहाण करून त्यातील एकाने दाताने चावा घेऊन जखमी केले. याबाबत सुरू असलेल्या खटल्याचा निकाल नुकताच लागला आहे. यामध्ये दोन सख्ख्या भावांसह त्यांच्या वडिलांनाही प्रत्येकी दोन वर्षांची सक्तमजुरी आणि ४५०० रुपये दंड अशी शिक्षा देण्यात आली आहे. सासवड येथील सहदिवाणी न्यायाधीश ए. आर. दिंडे यांनी नुकताच हा निर्णय दिला.
बाबासाहेब सीताराम टेकवडे, अमोल बाबासाहेब टेकवडे आणि अतुल बाबासाहेब टेकवडे (सर्व रा. जवळार्जुन, ता. पुरंदर) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यांच्याविरोधात सोमनाथ हरिभाऊ टेकवडे (वय ५५) यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. जखमी झालेले फिर्यादी सोमनाथ टेकवडे यांनी तिघांविरोधात जेजुरी येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. जेजुरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक केली. जेजुरी पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार एन. एल. मदने यांनी तपास करून याप्रकरणी सासवड येथील न्यायालयात खटला भरण्यात आला.