तीन वर्षांत शिक्षण मंडळाकडून पुस्तक खरेदीच नाही
By admin | Published: January 3, 2016 04:38 AM2016-01-03T04:38:23+5:302016-01-03T04:38:23+5:30
शिक्षणाचा सर्वात महत्त्वाचा घटक असलेल्या ‘अवांतर वाचना’साठी महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडून गेल्या ३ वर्षांत एकाही पुस्तकाची खरेदी करण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब उजेडात
पुणे : शिक्षणाचा सर्वात महत्त्वाचा घटक असलेल्या ‘अवांतर वाचना’साठी महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडून गेल्या ३ वर्षांत एकाही पुस्तकाची खरेदी करण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. दरवर्षी तीनशे कोटी खर्च करणाऱ्या मंडळाकडून या महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
महापालिका शिक्षण मंडळाच्या वतीने शहरामध्ये ३०० शाळा चालविल्या जातात, यामध्ये ८० हजारपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षण मंडळातील शिक्षकांचा पगार, पायाभूत सुविधा व इतर उपक्रमांसाठी दरवर्षी त्यांना महापालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येतो. नुकत्याच शिक्षण मंडळाच्या २०१६-१७ या वर्षीच्या ३४१ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास महापालिकेच्या मुख्य सभेने मान्यता दिली. शिक्षण मंडळाच्या या अंदाजपत्रकाची पडताळणी करीत असताना शिक्षण मंडळाकडून अवांतर वाचनासाठी गेल्या ३ वर्षांत पुस्तकांची खरेदीच करण्यात आली नसल्याचे उजेडात आले आहे. २०१६-१७ च्या अंदाजपत्रकामध्ये पुस्तक खरेदीसाठी आयुक्तांनी ३० लाख रुपयांची तरतूद सुचविली होती, मात्र स्थायी समितीने त्यामध्ये कपात करून ती १० लाखांवर आणली आहे.
शिक्षण मंडळाने २०१२-१३, १४-१५ या वर्षात पुस्तकांवर एका रुपयाचाही खर्च केला नाही. २०१५-१६ मध्ये अंदाजपत्रकामध्ये पुस्तक खरेदीसाठी साडेआठ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती, त्यामधून किती रुपयांच्या पुस्तकांची खरेदी झाली आहे, याची आकडेवारी अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही. मनसेचे सभासद बाळा शेडगे यांनी अवांतर वाचनाच्या पुस्तक खरेदीबाबत शिक्षण मंडळाकडून दाखविण्यात येत असलेल्या अनास्थेबाबात टीका केली.
औपचारिक शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचे अनुभवविश्व समृद्ध करण्यासाठी त्यांना अवांतर वाचनाची गोडी लागणे आवश्यक आहे. त्याकरिता शिक्षण मंडळाकडून योग्य प्रयत्न होताना दिसून येत नाहीत. याकडे लक्ष देण्याची आवश्यकता सभासदांनी व्यक्त केली.
...म्हणून ते पुस्तक खरेदी करीत नसावेत
मुख्याध्यापकांची बदली झाली किंवा ते निवृत्त झाल्यानंतर त्यांना सर्व पुस्तकांचा हिशेब द्यावा लागतो. त्यामुळे अनेक मुख्याध्यापक विद्यार्थ्यांना पुस्तके वाचायला देतच नाहीत. सर्व पुस्तके कपाटात कुलूप लावून बंद स्थितीमध्ये ठेवली जातात, असा आरोप काँग्रेसचे सभासद रवींद्र माळवदकर यांनी केला. मात्र मुख्याध्यापकांनी पुस्तकांचा हिशेब देण्याची आवश्यकता नाही, त्याऐवजी त्याचा वापर होऊन ती जितकी फाटतील तितके योग्य राहील, असा ठराव शिक्षण मंडळामध्ये करण्यात आला असल्याचे बाळा शेडगे यांनी या वेळी स्पष्ट केले.