बेकायदा पिस्टल बाळगल्याप्रकरणी तीन तरुणांना अटक; सिंहगड रस्ता पोलिसांची कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2024 20:26 IST2024-02-28T20:26:09+5:302024-02-28T20:26:20+5:30
गावठी पिस्टलसह दोन जिवंत काडतुसे हस्तगत

बेकायदा पिस्टल बाळगल्याप्रकरणी तीन तरुणांना अटक; सिंहगड रस्ता पोलिसांची कामगिरी
धायरी: सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन तरुणाजवळ विनापरवाना एक पिस्टल व दोन जिवंत काडतुसे आढळल्याने बुधवारी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. नामदेव रामभाऊ ढेबे (वय: २२ वर्षे, रा. रायकर मळा) आकाश मच्छिंद्र कदम (वय: २३ वर्षे, रा. खडक चौक, लोणारे वस्ती) जय संगमेश्वर दयाडे (वय: १९ वर्षे, रा. काळुबाई चौक, रायकरमळा ) सर्व राहणार धायरी, पुणे असे त्या तीन तरुणांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेकॉर्डवरील आरोपी तसेच संशयित व्यक्ती व गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, धायरी येथील रायकर मळा येथे एका झाडाखाली तीन तरुण बसले असून त्यांच्याकडे गावठी पिस्टल आहे. याबाबत वरिष्ठांना माहिती कळवून पोलिस उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर व त्यांची टीम त्या ठिकाणी गेले असता, पोलिसांना पाहताच आरोपी पळून जाण्याचा प्रयत्नात असतानाच पोलिसांनी त्यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याजवळ ५० हजार रुपयांचे एक गावठी पिस्टल व पाचशे रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतुसे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. हि कामगिरी परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलिस आयुक्त अप्पासाहेब शेवाळे, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार सचिन गायकवाड, प्रकाश पाटील, राजु वेगरे, स्वप्निल मगर, विनायक मोहिते, मोहन मिसाळ, विजय विरणक, योगेश उदमले यांच्या पथकाने केली.