पुण्यातली 'चित्तथरारक' घटना; चौथ्या मजल्यावरुन पडून मध्येच अडकलेल्या मुलीची सुखरूप सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 03:20 PM2021-08-09T15:20:06+5:302021-08-09T15:53:54+5:30
शुक्रवार पेठेतील थरार, १५ मिनिटात अग्निशमन जवानांनी केले रेक्यु ऑपरेशन यशस्वी
पुणे : एका रेक्यु ऑपरेशनामध्ये अग्निशमन दलाच्या जवानांनी अतिशय अवघड स्थितीत चौथ्या मजल्यावरील खिडकीच्या बाहेर लटकलेल्या १४ वर्षाच्या मुलीची सुटका केली. शुक्रवार पेठेतील गणेश अपार्टमेंटमध्ये सोमवारी सकाळी हा थरार अनेकांनी अनुभवला. अन अग्निशमन दलाच्या कार्याचे टाळ्याच्या गजरात अभिनंदन केले.
अग्निशमन दलाला सकाळी ९ वाजून ३५ मिनिटांनी एक कॉल आला. त्यात एक मुलगी क्रेनला अडकली असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार ५ मिनिटात अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहचली. तेव्हा त्यांनी पाहिले की, एक मुलगी चौथ्या मजल्यावर एका खिडकीच्या ग्रीलला पाय देऊन उभे असून तिने साडीला धरुन ठेवले आहे. या मुलीचा हात सुटल्यास ती कधीही खाली पडू शकते अशी स्थिती होती. ते पाहून अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने खाली जाळीचे नेट धरुन ठेवले. त्यानंतर काही जण वरच्या मजल्यावर जाऊन त्यांनी तेथून रस्सी तिच्याकडे टाकली. तोपर्यंत दुसर्या कर्मचाऱ्यांनी शिडी लावून त्यावरुन जवान तिच्यापर्यंत पोहचले. जवानांनी तिला पकडून खाली आणले.
याबाबत तिच्या नातेवाईकाकडे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यावर ती टेरेसवरुन पाय घसरुन पडली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. खिडकीचे ग्रील हे भिंतीपासून अगदी थोडे पुढे आहे. सुदैवाने त्यामध्ये तिचा पाय त्या ग्रीलला लागल्याने ती बचावली. ज्या खिडकीच्या ग्रीलला ती अडकली होती. तेथील महिलेने तिचा पाय धरुन ठेवला. तर वरच्या मजल्यावरील खिडकीतून साडी सोडण्यात आली. ती धरुन ही मुलगी उभी राहिली होती.
या कामगिरीमध्ये अग्निशमन अधिकारी सचिन मांडवकर, तांडेल कैलास पायगुडे, जवान राहुल नलावडे, अतुल खोपडे, मारुती देवकुळे, किशोर बने, संजय पाटील, अक्षय गांगड, विठ्ठल शिंदे, वाहनचालक राजू शेलार यांनी सहभाग घेतला.