ऐतिहासिक युद्धाचा थरार रंगमंचावर झाला ‘जिवंत’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 07:43 PM2019-08-29T19:43:15+5:302019-08-29T19:56:19+5:30
इंग्रज विरुद्ध मराठे या सागरी युद्धाचा थरार म्हणजे दर्याभवानी हे नाटक आहे .
पुणे: इंग्रजांना हवे असलेले खांदेरी बेट श्रीशिवछत्रपतींच्या आरमाराने समुद्रातील ज्या युध्दात ताब्यात ठेवले, त्या इ. स १६८० मधील युद्धाचा ऐतिहासिक थरार 'दर्याभवानी ' या नाटकाद्वारे पुण्यात ’जिवंत’ झाला. या रोमांचकारी नाट्याने रसिक भारावून गेले.
मुंबई आणि अलिबागच्या मध्ये खांदेरी नावाचे बेट (जलदुर्ग) लागते.इ स १६८० मध्ये श्रीशिवछत्रपतींच्या मावळ्यांनी हे बेट इंग्रजांकडून सागरी युद्धात जिंकून घेतले.इंग्रज विरुद्ध मराठे या सागरी युद्धाचा थरार म्हणजे दर्याभवानी हे नाटक आहे .यात चाळीस कलाकारांच्या संचात नृत्य.,नाट्य आणि मराठी रंगभूमीच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रत्यक्ष दोन जहाजांमधील इंग्रज आणि मराठे यांचे युद्ध रंगमंचावर साकारण्यात आले. उर्वीजा थिएटर (मुंबई) निर्मित ' दर्याभवानी ' हे ऐतिहासिक नाटक ४० जणांच्या संचासह सादर झाले.
या महानाटयाचे लेखन आणि गीत लेखन संदीप विचारे यांनी केले. दिग्दर्शन डॉ. अनिल बांदिवडेकर, यांचे तर नेपथ्य प्रसाद वालावलकर आणि संगीत मनोहर गोलांबरे यांचे आहे. नृत्य रचना सचिन गजमल यांची असून, वेशभूषेची जबाबदारी मोहिनी टिल्लू, कलिका विचारे, गणेश मांडवे यांनी सांभाळली आहे .यातील गाणी आदर्श शिंदे (गोंधळ) नंदेश उमप (पोवाडा) प्रा.गणेश चंदनशिवे (वासुदेव गीत) यांनी गायली आहेत. प्रकाश योजना शीतल तळपदे यांची आहे .या नाट्याचे नायक मायनाक भंडारी हे दयार्सारंग यांच्या बरोबरीने स्वराज्य आरमाराचे सुभेदार होते. इ.स.१६७९ चे सुमारास महाराजांनी सागरी शत्रूंना थोपविण्यासाठी मुंबई बंदराच्या तोंडाशी असणा-या खांदेरी उंदेरी बंदरावर किल्ला बांधण्याचा ठरविला. त्यादृष्टीने राजाच्या वेगाने हालचालीही सुरु झाल्या .मुंबई बेटावर नजर ठेवून सागरी शत्रूंच्या हालचालींना प्रतिबंध करण्याची राजांची या मागची योजना होती. शिवाजी महाराजांच्या या हालचालीने इंग्रज प्रचंड धास्तावले आणि त्यांचा हा हेतू तडीस जाऊ नये म्हणून इंग्रजांनी खांदेरी उन्देरीवर आपला हक्क दाखवीत महाराजांशी उघड उघड युद्ध पुकारले.कॅप्टन विलियम मिन्चीन, रिचर्ड केग्वीन, जॉन ब्रान्डबरी, फ्रान्सिस थोर्प असे नामांकित सागरी सेनानी खांदेरीवर पाठवून ते बेट मराठ्यांकडून काबीज करण्याचे मोठे प्रयत्न इंग्रजांनी केले.रिव्हेंज आणि हंटर नावाच्या दोन फ्रींगेटी त्यांनी पाठवल्या होत्या.मायनाक भंडा-यांनी अतिशय पराक्रमाने आणि चिवटपणाने प्रखर संघर्ष मांडीत इंग्रजांचा हा मनसुबा हाणून पाडला. या युद्धात इंग्रजांना मदत करण्या करता जंजि-याचा सिद्धी पण येतो या दोघांच्या म्हणजे सिद्दी आणि इंग्रज यांच्या आरमराला थळच्या समुद्रात मायनाक भंडारी आणि दौलतखांच्या नेतृत्वाखाली मराठे पाणी पाजतात आणि विजयश्री खेचून आणतात.. हा सर्व थरार 'दर्या भवानी ' द्वारे रंगमंचावर रसिकांना पाहण्याची संधी मिळाली.
..........