पुण्यात थरार; खराडीत कचरावेचक तरुणाचा गोळ्या झाडून खून
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 02:46 PM2022-08-21T14:46:54+5:302022-08-21T14:47:15+5:30
तरुण पुणे महापालिकेत कचरा वेचक म्हणून काम करत आहे
चंदननगर : खराडीतील एकनाथ पठारे वस्ती येथे रविवारी पहाटे सव्वासहाच्या दरम्यान दुचाकीवरून कामाला जाणाऱ्या कचरावेचक तरुणावर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी पाठीमागून तीन गोळ्या झाडल्या. या गोळीबारात अक्षय प्रकाश भिसे (वय २७, रा. एकनाथ पठारे वस्ती) याचा मृत्यू झाला. गोळीबारानंतर हल्लेखोर पसार झाले, अशी माहिती चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे यांनी दिली.
अक्षय भिसे हा पुणे महापालिकेत कचरा वेचक म्हणून काम करत आहे. येरवडा येथील डम्पिंग स्टेशनमध्ये तो कामाला नेहमीप्रमाणे सकाळी ६ वाजता निघाला होता. तर त्याचा मित्र खराडी बायपास रस्त्यावरील दुर्गा माता मंदिर येथे अक्षयची वाट पाहत होता. अक्षय घरातून निघाल्यावर साधारणपणे पुढे २०० मीटरवर पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी अक्षयवर तीन गोळ्या झाडुन पसार झाले. आजूबाजूच्या लोकांनी अक्षयच्या पत्नीला आणि मित्र रवींद्र गायकवाड याला कळवले. त्यांनी घटनास्थळी येऊन रस्त्यावर पडलेल्या अक्षयला रिक्षामधून खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, तेथे डॉक्टरांनी अक्षयला मृत घोषित केले. पुढील तपास चंदननगर पोलीस स्टेशन करत आहे.