उत्तमनगर येथे बंदूक, तलवारीचा थरार; रविवारी रात्री दारूच्या दुकानात अज्ञातांकडून दरोडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 17:28 IST2023-11-20T17:28:26+5:302023-11-20T17:28:35+5:30
आर आर वाइन्स दुकानातून जवळपास ३ लाख रुपयांची रोकड आणि दारूच्या बाटल्या चोरून घेऊन गेले

उत्तमनगर येथे बंदूक, तलवारीचा थरार; रविवारी रात्री दारूच्या दुकानात अज्ञातांकडून दरोडा
शिवणे : रविवारी रात्री संपूर्ण जग क्रिकेट विश्वचषकाचा थरार अनुभवत असताना उत्तमनगर येथील नागरिकांनी मात्र बंदूक आणि तलवारीचा थरार अनुभवला. रविवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास अहिरे गेट येथील आर आर वाईन्स या दारूच्या दुकानात सहा अज्ञात तरुणांनी दरोडा टाकल्याची घटना घडली आहे.
सर्वत्र क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना रंगला असताना अहिर गेट जवळ मुख्य रस्त्यावर वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या आर आर वाइन्स दुकानातून जवळपास ३ लाख रुपयांची रोकड आणि दारूच्या बाटल्या चोरून नेल्याची घटना घडली आहे. दोन दुचाकीवर आलेल्या सहा अज्ञात युवकांनी हा दरोडा टाकल्याची माहिती मिळत आहे. सहा जणांपैकी दोन जणांनी तलवार हातात घेऊन ‘जो कोणी मध्ये येईल त्याला मारून टाकिन’ अशा प्रकारे लोकांना धमकावत तलवार हवेत फिरवली ज्यामुळे आजूबाजूच्या दुकानदारांनी घाबरुन आपली दुकाने बंद केली. दुचाकीवर आलेली सर्वजण साधारण २० ते २२ वयोगटातील असल्याचे यावेळी प्रत्यक्ष दर्शनींनी सांगितले. गुन्हा घडल्यानंतर दुकानातील कर्मचारी मनोज मोरे यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहा.पोलीस आयुक्त भिमराव टेळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल तांबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर, पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, सपोनि उमेश रोकडे यांनी घटनास्थळी धाव घेत गुन्ह्याची माहिती घेतली. उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर पुढील तपास करत आहेत.