पुण्यात मध्यरात्री खुनाचा थरार; सराईत गुन्हेगाराचा भर वस्तीत कोयत्याने वार करून खून
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 09:39 AM2022-11-23T09:39:20+5:302022-11-23T09:40:02+5:30
नाना पेठेतील राजेवाडी परिसरात मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली
पुणे प्रतिनिधी/किरण शिंदे : पुण्यातील समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून खुनाचा भयानक प्रकार उघडकीस आला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास भर वस्तीत सहा जणांनी मिळून एका सराईत गुन्हेगाराचा कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून केला. कोयत्याने आणि दगडविटांनी मारहाण करून अतिशय निर्घृणपणे त्याचा खून करण्यात आला. मारहाण करणाऱ्यांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. नाना पेठेतील राजेवाडी परिसरात मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
रोहन रवींद्र पवार (सर्वे नं 898, राजेवाडी, नाना पेठ, पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. याप्रकरणी सुशांत उर्फ मट्या कुचेकर, तेजस जावळे, राजन उर्फ रोहित काउंटर, अतिश उर्फ प्रकाश फाळके, आदित्य केंजळे आणि उषा कुचेकर या सहा जणांवर समर्थ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील महिलेसह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मयत यांच्यात पूर्वी भांडण झाले होते. याच भांडणाच्या रागातून हा खून झालाय. मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास आरोपी राजन उर्फ रोहित काउंटर याने रोहित याला राहत्या घरातून बाहेर बोलावून घेतले. त्यानंतर इतर आरोपींनी भर रस्त्यात त्याच्यावर कोयत्याने वार केले. आरोपी सुशांत कुचेकर यांनी कोयत्याने रोहनच्या अंगावर व हातावर वार केले. तर तेजस जावळे यांनी चाकूने अंगावर आणि तोंडावर वार केले. इतर आरोपी यांनी त्याच्या तोंडावर आणि अंगावर विटांनी मारहाण करून त्याला ठार मारले.
मध्यरात्री भर वस्तीत घडलेल्या या प्रकाराने काही काळ दहशत पसरली होती. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. इतर आरोपी मात्र पसार झाले आहेत. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.