स्वरसागर संगीत महोत्सव रंगतदार
By admin | Published: March 10, 2016 12:36 AM2016-03-10T00:36:22+5:302016-03-10T00:37:52+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वरसागर संगीत महोत्सवाच्या शास्त्रीय गायनाची आणि बहारदार कथक नृत्याची मैफल सादर झाली. त्यास रसिकांनी उत्कट दाद दिली.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वरसागर संगीत महोत्सवाच्या शास्त्रीय गायनाची आणि बहारदार कथक नृत्याची मैफल सादर झाली. त्यास रसिकांनी उत्कट दाद दिली.
महोत्सवाच्या पहिल्या सत्रात स्थानिक कलाकारांचे गायन व वादन झाले. या वेळी अभयसिंह वाघचौरे यांनी राग बागेश्री सादर केला. त्यानंतर त्यांनी ‘घेई छंद मकरंद’ हे नाट्यपद सादर केले. सुनील पाटील यांनी माऊथआॅर्गन वादन केले. बीना जैन हिने सिंथेसायझरवर दोन गीते सादर केली. तसेच स्नेहा कुलकर्णी हिने राग बागेश्री सादर केला. ‘बाजे रे मुरलिया बाजे’ हे भजन सादर केले. त्यानंतर युवा गायक कृष्णेंद्र वाडीकर यांचे बहारदार गायन झाले. त्यांनी राग ‘पटदीप’ सादर केला. त्रितालात निबद्ध असलेल्या मध्यलयीत बडा ख्याल आणि द्रुत लयीतील त्यांचे जोरकस आणि दमदार गायन रसिकांना आश्वासक गायकीचा प्रत्यय देऊन गेले. ‘देह जावो अथवा राहो’ या अभंगाने त्यांनी आपल्या गायनाची सांगता केली. त्यांनी संवादिनीची साथ उमेश पुरोहित यांनी व तबलासाथ संतोष साळवे यांनी केली. टाळांची साथ विश्वास कळमकर यांनी केली. त्यानंतरच्या सत्रात सतारीच्या अंगाने वादन करणारी गिटार, सारंगी व तबल्याच्या साथीने दक्षिण आफ्रिकेतील कहोन हे वाद्य यांची अप्रतिम जुगलबंदी या वेळी रसिकांना अनुभवायला मिळाली.
मनीष पिंगळे यांनी गिटार व संदीप मिश्रा यांनी सारंगीवर राग मारुबिहाग सादर केला. त्यांना तबलासाथ समीर सूर्यवंशी यांनी केली. विलंबित व द्रुत लयीतील आलापांसह रंगलेले त्यांचे जोड वादन रसिकांना मंत्रमुग्ध करून गेले. नंतरच्या सत्रात मूळचे दक्षिण आफ्रिकेतील असलेले कहोन हे वाद्य जोडीला घेऊन अप्रतिम जुगलबंदीचा आविष्कार रसिकांनी अनुभवला. गौतम शर्मा यांनी कहोनच्या साथीने पर्कशनचा वापर वादनात केला. गिटार, सारंगी, कहोन व तबला यांचे मिश्र भैरवी, किरवाणीमधील फ्युजनने रसिकांना वेगळ्याच विश्वात नेले.(प्रतिनिधी)
४शेवटच्या सत्रात ज्येष्ठ कथक नर्तक पं. बिरजूमहाराज यांचे सुपुत्र व शिष्य पं. दीपकमहाराज व नात शिंजीनी कुलकर्णी यांनी अप्रतिम कथक नृत्य सादर केले. तीन तालातील सोळा मात्रांच्या नृत्याने दीपकमहाराज व शिंजीनी यांनी सुरुवात केली. त्यानंतर उपज, उठाण, परण, आमद, लड, परमेलू यांनी रंगवलेला हा देखणा नृत्याविष्कार रसिकांना मंत्रमुग्ध करुन गेला. यात दीपकमहाराज यांनी सादर केलेला नटखट माखनचोर, तर त्यातील मनमोहक व लडिवाळ विभ्रमांनी टाळ्यांची दाद घेऊन गेला. या नृत्याविष्कारात समर्पक अशी तबलासाथ प्रांशू चतुरलाल यांनी, सतारसाथ समीप कुलकर्णी यांनी, बासरीसाथ अझरुद्दीन शेख यांनी, गायन व संवादिनीसाथ गुलाम वारीस यांनी केली. या वेळी सुप्रसिद्ध नृत्यांगना व पं. बिरजूमहाराज यांच्या कन्या ममतामहाराज यांची विशेष उपस्थिती होती.