CCTV च्या माध्यमातून विनाहेल्मेट कारवाई; पुणेकरांनी गेल्या वर्षभरात भरला तब्बल ११ कोटींचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 03:43 PM2022-01-12T15:43:21+5:302022-01-12T15:43:36+5:30
गेल्या वर्षभरात अशा १८ लाख १९५ विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, त्यांना ८९ कोटी ९६ लाख ५ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे
पुणे : शहरात सीसीटीव्हीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर दंड आकारणी करण्यात येते. गेल्या वर्षभरात अशा १८ लाख १९५ विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, त्यांना ८९ कोटी ९६ लाख ५ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यापैकी २ लाख २४ हजार ३९२ जणांनी ११ कोटी २१ लाख ९६ हजार रुपये दंड भरला आहे. केवळ हजार रुपयांमध्ये मिळणारे हेल्मेट अनेकांनी खरेदी केले आहे. मात्र, त्याचा वापर न केल्याने इतका मोठा दंड पुणेकरांनी भरला आहे. अजूनही १५ लाख ७४ हजार ६७५ जणांचा ७८ कोटी ७३ लाख ३७ हजार ५०० रुपयांचा दंड थकीत आहे.
पुण्यात हेल्मेटसक्तीविरोधात अनेकदा आंदोलन झाले; पण सर्वोच्च न्यायालयाने याबाबत आदेश दिला असल्याने त्यावर राज्य शासनही काही करू शकत नाही. विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या अनेकांना काही हजारांचा दंड झाला आहे. तरीही ते हेल्मेट वापरताना दिसत नाहीत. त्याचबरोबर असंख्य वाहनचालक वाहतुकीचे नियम बेधडकपणे मोडतात. अशांवरही वाहतूक पोलीस कारवाई करतात.
वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये ५ लाख ९३ हजार ८७० केसेसमध्ये पुणेकरांनी तडजोड शुल्क म्हणून आतापर्यंत १९ कोटी ४५ लाख ९२ हजार २०० रुपयांचा दंड भरला आहे. त्याचवेळी १७ लाख ८६ हजार १६१ केसेस तब्बल ८४ कोटी ४८ लाख ३२ हजार ७०० रुपयांचा दंड पुणेकरांकडे थकीत आहे. त्यामुळे आता तरी पुणेकरांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करून आपल्या खिशाला लावून घेऊ नये.