पुरावा नष्ट करण्यासाठी सिमकार्ड खाडीत दिले फेकून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:10 AM2021-07-27T04:10:54+5:302021-07-27T04:10:54+5:30

पुणे : पूर्ववैमनस्यातून करण्यात आलेल्या गोळीबाराचा बदला घेण्यासाठी बबलू गवळीच्या हत्येची सुपारी दिल्याप्रकरणी अटक केलेल्या पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या ...

Throw the SIM card into the bay to destroy the evidence | पुरावा नष्ट करण्यासाठी सिमकार्ड खाडीत दिले फेकून

पुरावा नष्ट करण्यासाठी सिमकार्ड खाडीत दिले फेकून

Next

पुणे : पूर्ववैमनस्यातून करण्यात आलेल्या गोळीबाराचा बदला घेण्यासाठी बबलू गवळीच्या हत्येची सुपारी दिल्याप्रकरणी अटक केलेल्या पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या भाजपच्या माजी नगरसेवकाच्या पोलीस कोठडीत २८ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

विवेक यादव (वय ३८, रा. वानवडी) असे या माजी नगरसेवकाचे नाव आहे. मोबाईलमधील सिमकार्ड त्याने मुंबईतील वाशी येथील खाडीत फेकून दिले आहे. त्यामुळे त्यावर पुरावा नष्ट केल्याचा देखील गुन्हा दाखल आहे, असे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये नमूद आहे. यादव याच्याकडून दोन मोबाईल आणि एक कार जप्त केली आहे. या प्रकरणात यापूर्वी राजन जॉनी राजमनी (वय ३८, रा. कोंढवा) आणि इब्राहिम ऊर्फ हुसेन याकूब शेख (वय २७, रा. वाकड) या दोन सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. तर या तिघांसह एका अज्ञात व्यक्तीविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. बबलू गवळी याने २०१६ मध्ये गणेशोत्सवादरम्यान पूर्ववैमनस्यातून विवेक यादव याच्यावर गोळीबार करून गंभीर जखमी केले होते. त्याचा सूड घेण्यासाठी विवेक यादवने सराईत गुन्हेगार राजन राजमनी आणि इब्राहिम ऊर्फ हुसेन याकूब शेख या दोघांना प्रत्यक्ष भेटून आणि व्हॉट्सअप कॉल, चॅटिंगद्वारे बबलू गवळीच्या खुनाची सुपारी दिली होती, असे फिर्यादीत नमूद आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेले पिस्तूल कोठून आणले? आरोपींचा आणखी कोणी साथीदार आहेत का याचा शोध घेण्यासाठी तसेच गुन्ह्यातील आणखी दोन पिस्तूल जप्त करण्यासाठी आरोपीच्या पोलीस कोठडीत सात दिवसांची वाढ करण्याची मागणी सरकारी वकील ज्योती वाघमारे यांनी केली. या प्रकरणात भा.द.वि कलम ३०२ (खून) चा समाविष्ट करावे, असा अर्ज गवळीतर्फे ॲड. पूजा अगरवाल यांनी न्यायालयात दाखल केला आहे. या अर्जावर २८ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

-------------------------

Web Title: Throw the SIM card into the bay to destroy the evidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.