बोअरवेलमध्ये दगड टाकून बंद करण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 01:18 AM2019-03-04T01:18:46+5:302019-03-04T01:18:54+5:30
सध्या दुष्काळामुळे जिल्हाभरातील दुष्काळसदृश तालुक्यामध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
खोडद : सध्या दुष्काळामुळे जिल्हाभरातील दुष्काळसदृश तालुक्यामध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, दुष्काळाचा दाह अद्याप इतर तालुक्यांच्या तुलनेने कमी असलेल्या जुन्नरमधील खोडदमध्ये मात्र आहे ते पाणी शेतीला मिळण्यात अडचण यावी, यासाठी बोअरवेलमध्ये दगड टाकण्याचा प्रताप काही चोरट्यांनी केला आहे. शिवाय, त्याच शेतातील सुमारे सहाशे किलो डाळींबही चोरट्यांनी गेल्याच आठवड्यात चोरून नेली आहे.
हिवरेतर्फे नारायणगाव येथील शेतकरी चंद्रशेखर अर्जुन कदम यांच्या शेतामध्ये हा प्रकार घडला आहे. त्याबाबत त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली. याबाबत अधिक माहिती अशी की, हिवरे तर्फे नारायणगाव येथील शेतकरी चंद्रशेखर अर्जुन कदम यांची येथे माळवस्तीवर डाळींब
शेती आहे. मागील आठवड्यात कदम यांच्या डाळिंबाच्या बागेतील सुमारे ६०० किलो डाळिंबांची चोरी केल्याचे निदर्शनास आले
आहे. विशेषत: तयार झालेल्या डाळींब हेरून चोरट्याने ती चोरली आहेत.
>चोरी केल्यानंतर झाडावर डाळींब फळाला लावलेल्या कापडी पिशव्या शेतामध्ये अस्ताव्यस्त टाकून दिल्या. त्या पिशव्यांवरूनच कदम यांना चोरीची शंका आली आणि त्यांनी इतर बागेत फिरून पाहणी केल्यावर सुमारे सहाशे किलो डाळींब चोरल्याचे लक्षात आले. त्यावर कदम यांनी पोलिसात तक्रार केली नव्हती. मात्र शेतात मचाण उभी करून त्यावरून गस्त घालण्याची व्यवस्था केली. मात्र ती गस्त चुकवून आज पुन्हा चोरट्यांनी त्यांच्या शेतातील बोअरवेलमध्ये मोठी दगड टाकून बोअरवेल बंद करण्याचा प्रयत्न केला. सकाळी ही बाब कदम यांच्या लक्षात आली त्यावेळी त्यांनी पोलिसांत तक्रार दिली.