पाणीपट्टीवाढ विरोधात गदारोळ
By admin | Published: February 17, 2016 01:40 AM2016-02-17T01:40:40+5:302016-02-17T01:40:40+5:30
शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी पाणीपट्टीमध्ये पुढील ५ वर्षांत टप्प्याटप्याने ८७ टक्के
पुणे : शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी पाणीपट्टीमध्ये पुढील ५ वर्षांत टप्प्याटप्याने ८७ टक्के, त्यापुढील २५ वर्षे सलग ५ टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावाविरोधात विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभागृह दणाणून सोडले. मनसेने निषेधार्थ काळे कपडे परिधान करून, तर शिवसेनेने वारकऱ्यांच्या वेषात टाळ वाजवीत पाणीपट्टीवाढीचा विरोध केला.
महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी मांडलेल्या पाणीपट्टीवाढीच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी विशेष मुख्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी सभा सुरू करताच शिवसेना, मनसेच्या सभासदांनी त्यांच्यासमोरील जागेत धाव घेऊन पाणीपट्टीवाढ विरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्याला राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या सदस्यांनी प्रत्युत्तर दिले. त्यानंतर महापौरांनी सर्वांना जागेवर बसण्याचे आदेश दिल्यानंतर सभागृहात प्रस्तावावर चर्चा सुरू झाली.
अभय छाजेड म्हणाले, ‘आयुक्तांनी कोणत्या कलमाखाली हा प्रस्ताव आणला आहे. कलम ९९ खाली केवळ एक वर्षासाठी करवाढ करता येते; मग २०४७ पर्यंत करवाढीचा प्रस्ताव का ठेवला आहे?’
प्रशासनाला २०४७ पर्यंतची पाणीपट्टीवाढ करण्याचा अधिकार नाही. झोपडपट्टी भागातील लोकांच्या घरात पाणी भरून ठेवण्यासाठी हंडे नाहीत. त्यांनी टट्ी भरायची कुठून, असा सवाल कमल व्यवहारे यांनी केला. माधुरी सहस्रबुद्धे म्हणाल्या, ‘मलकापूर येथे मीटरने पाणीपुरवठा होत असल्यामुळे तिथे अत्यंत काळपूर्वक पाणी वापरले जात असल्याचे आम्हांला दिसून आले.’ बाबुराव चांदेरे म्हणाले, ‘शहराला २४ तास पाणीपुरवठा होणे ही काळाजी गरज आहे.
चेतन तुपे, सुभाष जगताप, धनंजय जाधव,अविनाश बागवे,सचिन भगत, संजय भोसले,महेंद्र पठारे,अनिता वागस्कर,दत्ता बहिरट,वसंत मोरे,बाळा शेडगे,अशोक येनपुरे,पृथ्वीराज सुतार, अस्मिता शिंदे, किशोर शिंदे, दिलीप बराटे, वसंत मोरे,संजय बालगुडे यांनीही विचार मांडले.२४ तास पाणीपुरवठा योजनेच्या फायद्याबद्दल कोणीच बोलत नाहीत. आपले ४ टीएमसी पाणी वाचणार आहे. एका धरणाएवढी आपली क्षमता वाढते आहे. पाण्याच्या १६१८ किलोमीटर पाइपलाइन होणार आहेत. यामुळे या योजनेला मंजुरी द्यावी.’
- बंडू केमसे, सभागृह नेते
पाणीपट्टीवाढीच्या डॉकेटलाच आमचा विरोध आहे. हे डॉकेट नियमबाह्य आणि बेकायदेशीर आहे. ३० वर्षांसाठी तुम्हांला करवाढ लावता येत नाही. कलम ९९ नुसार केवळ सरकारी वर्षापुरतीच करवाढ करता येते. आयुक्तांच्या प्रस्तावानुसार ३० वर्षांत पाणीपट्टीमध्ये २३२ टक्के वाढ होणार आहे. फक्त पाणीपट्टीवाढ नाही, तर मलनिस्सारण करातदेखील वाढ सुचविली आहे. ज्या पद्धतीने तुम्ही दरवाढ आणताय त्याला आमचा विरोध आहे.’
- अरविंद शिंदे, विरोधी पक्षनेते
‘राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपने मिळून पुणेकरांचे पाकीट मारायचे काम सुरू केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाणीपट्टीवाढ विरोधात नागरिकांची मते जाणून घेतली. त्यांनी कळकळीने त्यावर मते व्यक्त केली आहेत.’- बाबू वागस्कर, मनसेचे गटनेते