ठुमरी, लोकसंगीत, भजनाला रसिकांची मनमुराद दाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:18 AM2021-02-23T04:18:26+5:302021-02-23T04:18:26+5:30
पुणेः खयाल, ठुमरी, दादरा, सरगम गीत, टप्पा, बहुभाषिक लोकसंगीत, भावगीत, गझल, नाट्यगीत, भजन अशा विविध संगीत प्रकारांसह भावगर्भ अशा ...
पुणेः खयाल, ठुमरी, दादरा, सरगम गीत, टप्पा, बहुभाषिक लोकसंगीत, भावगीत, गझल, नाट्यगीत, भजन अशा विविध संगीत प्रकारांसह भावगर्भ अशा व्हायोलीनवादनाचा समावेश असलेल्या 'क्लासिकल अँड बियाॅंड' या सांगीतिक कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली.
निमित्त होते प्रेरणा संस्था आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने मनोहर मंगल कार्यालयात आयोजित 'क्लासिकल अँड बियाँड' या सांगीतिक कार्यक्रमाचे.
यावेळी प्रेरणा संस्थेतर्फे कै.कॅप्टन शंकर कृष्ण जोशी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा युवा पुरस्कार गुरू सुरेश तळवलकर यांचे शिष्य जगमित्र रामलिंग लिंगाडे, वेदांग वीरेंद्र जोशी, भार्गव व्यंकटेश देशमुख आणि गंगाधार शिंदे, प्रमोद मराठे यांचे शिष्य ऋषीकेश पूजारी, शौनक अभिषेकी यांचे शिष्य विश्वजित मेस्त्री यांना पंडित रघुनंदन पणशीकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, या वेळी पंडित रघुनंदन पणशीकर, गायिका विदुषी सानिया पाटणकर यांच्या गायनासह राजस उपाध्ये यांचे एकल व्हायोलीनवादन झाले.
मैफलीच्या प्रारंभी राजस उपाध्ये यांनी व्हायोलीन 'तेरे सूर और मेरे गीत', 'मोह मोह के धागे' आणि 'तुही रे' आणि 'तुझे कितना चाहने लगे हम' अशी लोकप्रिय जुनी-नवी गीतांची शास्त्रीय संगीतावर आधारित मेडली सादर केली. त्यानंतर त्यांनी राग काफी रागामध्ये एक धून आणि एक तराणा सादर केला. त्यानंतर प्रेरणा संस्थेच्या संचालिका विदुषी सानिया पाटणकर यांनी राग बसंती केदारने आपल्या गायनाची सुरूवात केली. त्यानंतर राग देसमध्ये 'रिमझिम बरसे मेहरवा' हा टप्पा सादर केला. नंतर दादरा मध्ये 'छा रही काली घटा' हे गीत सादर करून त्यांच्या गायनाची सांगता केली.
कार्यक्रमात तबल्यावर प्रशांत पांडव आणि अतुल कांबळे यांनी साथ संगत केली. तर अभिषेक शिनकर यांनी हार्मोनियमवर, अमन वारखेडकर यांनी सिंथेसायझरवर, तर इश्वरी श्रीगार आणि रुची शिरसे यांनी तानपुऱ्यावर साथ संगत केली. कार्यक्रमाचे निवेदन मंजूषा गाडगीळ यांनी केले.
---------------