जुलैतील पावसाने भागविली तहान
By admin | Published: August 8, 2016 01:14 AM2016-08-08T01:14:27+5:302016-08-08T01:14:27+5:30
जुलै या एकाच महिन्यात झालेल्या संततधार पावसाने पवना धरण ८२ टक्के भरले आहे. त्यामुळे हे पाणी वर्षभर पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणार आहे
पिंपरी : जुलै या एकाच महिन्यात झालेल्या संततधार पावसाने पवना धरण ८२ टक्के भरले आहे. त्यामुळे हे पाणी वर्षभर पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणार आहे. आजअखेर ९२.५ टक्के पाणीसाठा झाला आहे. महापालिकेने पाणीकपात मागे घेतली असून, सोमवारपासून दिवसाआड पाणीकपात मागे घेतली आहे. त्यामुळे नियमित पाणीपुरवठा होणार आहे.
पवना धरणाचा एकूण साठा २७२.११ दशलक्ष घनमीटर आहे. त्यामध्ये २४०.९७ दशलक्ष घनमीटर एवढा उपयुक्त साठा आहे. गतवर्षी आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात पाणीसाठा ६५.३५ टक्के एवढा होता. सध्या २५ टक्के कपात पाणीपुरवठ्यात केली असून, आजच्या धरणसाठ्यानुसार हा पाणीपुरवठा २० एप्रिल २०१७पर्यंत पुरेल इतका आहे. १५ टक्के पाणीकपात केल्यास २२९ दिवस म्हणजे २० मार्च २०१७ पर्यंत पाणीपुरवठा करता येईल. पाणीकपात १० टक्के केल्यास २१२ दिवस म्हणजे ३ मार्च २०१७ पर्यंत पाणीपुरवठा करता येईल आणि कपात रद्द केली, तर १० फेब्रुवारी २०१७ पर्यंत पाणीपुरवठा करणे शक्य होईल, अशी माहिती आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली होती. (प्रतिनिधी)