‘हिंदकेसरी’ कुस्ती स्पर्धेचा थरार उद्यापासून
By admin | Published: April 26, 2017 04:08 AM2017-04-26T04:08:24+5:302017-04-26T04:08:24+5:30
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेचा थरार गुरुवारपासून (दि. २७) रंगणार आहे.
पुणे : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेचा थरार गुरुवारपासून (दि. २७) रंगणार आहे.
बाबूराव सणस मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेच्या विजेतेपदाचा फैसला ३० तारखेला होईल. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मल्लांची वजने होतील. शुक्रवारी राज्याचे शिक्षण व क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते स्पर्धेच्या उद्घाटनानंतर स्पर्धेला प्रारंभ होईल. या वेळी महापौर मुक्ता टिळक, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ उपस्थित होणार आहेत. लढतींना संध्याकाळी ४ नंतर प्रारंभ होईल, अशी माहिती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, स्पर्धेचे तांत्रिक अधिकारी दिनेश गुंड, काका पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी २९ राज्यांतील सुमारे २०० खेळाडू सहभागी झाले आहेत. हिंदकेसरी किताबविजेत्यास २.५० लाख रुपये व चांदीची गदा बक्षीस म्हणून देण्यात येईल. स्पर्धेत एकूण १४ लाख ६५ हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. हिंदकेसरी किताबासह (८२ ते १३० किलो) ५० वी वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा इतर सात विविध गटांत रंगणार आहेत. यात ५१ किलो, ५५ किलो, ६३ किलो, ६७ किलो, ७५ किलो, ८५ किलो व ८२ ते १०० किलो खुला गट व हिंदकेसरीचा खुला गट (८२ ते १३० किलो) या गटांचा समावेश आहे. याच वेळी ५० वी वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धादेखील होणार आहे.
‘हिंदकेसरी स्पर्धेचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. त्याचबरोबर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी
वर्ष आहे.
१९९२ नंतर या महत्त्वाच्या टप्प्यावर पुन्हा हा मान आम्हाला मिळाला. आमच्यासाठी ही बाब खचितच आनंददायी आहे.
(क्रीडा प्रतिनिधी)