Maharashtra Rain Update: राज्यात वादळी पावसाचा इशारा; मॉन्सून दोन दिवसांत महाराष्ट्रात दाखल होणार
By श्रीकिशन काळे | Published: June 3, 2024 03:47 PM2024-06-03T15:47:27+5:302024-06-03T15:48:01+5:30
यंदा मात्र सर्व गोष्टी अनुकूल असल्याने मॉन्सूनची वाटचाल अतिशय योग्यरित्या सुरु
पुणे: महाराष्ट्रामध्ये मॉन्सून येण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले असून, येत्या तीन-चार दिवसांमध्ये मॉन्सून कोकणात आणि त्यानंतर पुण्यात येणार आहे. राज्यात ढगाळ वातावरण तयार झाल्याने वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. पुण्यातही सकाळपासूनच आकाशात ढग तयार झाले असून, काही भागात हलक्या सरींनी हजेरी देखील लावली आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी मॉन्सूनचा केरळमध्येच मुक्काम होता. त्यानंतर रविवारी (दि.२) तिथून मजल थेट तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटकचा काही भाग व्यापला आहे. मॉन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक वातावरण तयार झाल्याने महाराष्ट्रात येत्या तीन-चार दिवसांमध्ये दाखल होऊ शकतो, असा अंदाज देण्यात आला आहे. गेल्या वर्षी मॉन्सून वेळेवर आला नव्हता, आठ दिवसांचा उशीर त्याला झाला होता. यंदा मात्र सर्व गोष्टी अनुकूल असल्याने मॉन्सूनची वाटचाल अतिशय योग्यरित्या होत आहेत.
अरबी समुद्रातून येणाऱ्या मॉन्सूनच्या वाऱ्यासोबत बाष्पयुक्त ओलावा येत असून, वाढलेल्या तापमानामुळे दमट व उष्ण वातावरण तयार झाले आहे. परिणामी दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांमध्ये मॉन्सून गोवा, दक्षिण कोकण, दक्षिण-मध्य महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे, अशी माहिती ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यमी यांनी दिली.