Weekly Holiday:...म्हणून सुरु झाली साप्ताहिक सुट्टी', मराठमोळ्या जननायकाचा तब्बल ६ वर्षांचा संघर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 12:51 PM2024-06-10T12:51:21+5:302024-06-10T12:51:54+5:30
इंग्रज सरकारच्या काळात जननायक नारायण लोखंडे यांनी १० हजार कामगारांसमोर केलेल्या प्रभावी भाषणामुळे इंग्रजांना झुकावे लागले
भारतीयांना रविवारची पहिली साप्ताहिक सुट्टी मिळाली ती १० जून १८९० रोजी. नारायण मेघाजी लोखंडे (Narayan Meghaji Lokhande) या मराठमोळ्या जननायकाने तब्बल सहा वर्षे केलेल्या संघर्षामुळे भारतीयांना हा हक्काचा सुट्टीचा दिवस मिळाला. त्यानिमित्ताने....
रविवार हा सुट्टीचा, आनंदाचा, सहकुटुंब एकत्रित राहण्याचा
‘दिवस उद्याचा सवडीचा, रविवार माझ्या आवडीचा’ हे बालगीत जनमानसात कित्येक पिढ्या लोकप्रिय आहे. रविवारच्या सुट्टीची (Weekly Holiday) वाट सगळेच पाहत असतात. शाळेत जाणाऱ्या बच्चे कंपनीपासून ते ऑफिसला, कंपनीमध्ये किंवा अन्य ठिकाणी नोकरीला जाणाऱ्या साहेब, मॅडम, कर्मचारी यांच्यापर्यंत कोणालाही विचारले, तुमचा आवडता दिवस कोणता, तर प्रत्येकाचे ठरलेले उत्तर असणार रविवार. कारण रविवार हा सुट्टीचा, आनंदाचा, सहकुटुंब एकत्रित राहण्याचा, एन्जॉय करण्याचा वार. पण, तुम्हाला माहिती आहे, आपल्याला प्रिय असलेली ही रविवारची सुट्टी खूप मोठ्या संघर्षानंतर सुरू झाली आहे. भारतात रविवार हा सुट्टीचा दिवस सुरू झाला तो १० जून १८९० या दिवसापासून. आणि बरं का, ही रविवारची सुट्टी आपल्यावर त्या काळी राज्य करणाऱ्या इंग्रज साहेबांच्या मेहेरबानीने नव्हे, तर कामगार चळवळीचे जनक मानले गेलेल्या नारायण मेघाजी लोखंडे या मराठमोळ्या जननायकाने केलेल्या तब्बल सहा वर्षांच्या संघर्षामुळे मिळाली. नारायण लोखंडे यांच्या या लढ्याचा व रविवारच्या सुट्टीचा इतिहास मोठा रंजक आहे.
ब्रिटिश जोरजबरदस्तीने अधिक काम करून घेत
आपल्या भारतात औद्योगिक क्रांतीआधी मोठ्या प्रमाणात बलुतेदारी पद्धत असल्याने सुट्टी अशी ठराविक नसायची. त्यामुळे केशर्तनालय, चर्मकार, किराणा मालाचे दुकानदार अशा विविध व्यावसायिकांच्या सुट्ट्या ऐच्छिक वा विविध दिवशी असत. औद्योगिक क्रांतीनंतर नोकरी ही संकल्पना भारतात रुजल्याने साप्ताहिक सुट्टीची गरज भासू लागली. १८५४ला मुंबईत सुरू झालेल्या पहिल्या कापड गिरणीनंतर भारतात १८७०पर्यंत महत्त्वाच्या सर्व ठिकाणी गिरण्यांचे प्रस्थ वाढले. तोकडे वेतन, कामाचे अनिर्बंध तास, सुट्टी आणि विश्रांतीचा अभाव अशी तेव्हाची परिस्थिती होती. १८८१ साली भारतात आलेल्या फॅक्टरी ॲक्टनुसार बालकामगारांचे किमान वय सात, तसेच कामाचे तास नऊ असे ठरले. त्यात आठवड्यांच्या सुट्टीचीही तरतूद केली होती. मात्र, महिला व प्रौढ कामगारांसाठी अशी तरतूद नव्हती. ब्रिटिश (British Government) जोरजबरदस्तीने अधिक काम करून घेत असत. एकप्रकारे पिळवणूकच होती ती. त्या विरोधात पहिला आवाज उठवला तो रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी.
इंग्रज सरकारला त्यांच्यासमोर झुकावे लागले
त्यांनी सुरुवातीला ५३,००० कामगारांच्या सह्यांचे एक निवेदन ब्रिटिशांना देत आठवड्याभराला एका सुट्टीची मागणी केली. तसेच, सूर्योदय ते सूर्यास्त हीच कामाची वेळ असली पाहिजे. दुपारी अर्धा तास विश्रांती मिळाली पाहिजे अशा मागण्याही या निवेदनात केल्या होत्या. त्याकडे इंग्रज सरकारने साफ दुर्लक्ष केले. यामुळे संतापलेल्या लोखंडे यांनी मग प्रखर आंदोलन केले. आंदोलनादरम्यान त्यांनी दहा हजार कामगारांसमोर केलेल्या प्रभावी भाषणामुळे इंग्रज सरकारला त्यांच्यासमोर झुकावे लागले. हा दिवस होता १० जून १८९०. हा लढा सोपा नव्हता. लोखंडे यांनी तो जिद्दीने यश येईपर्यंत सुरू ठेवला. त्यांच्या या आंदोलनाला आलेल्या यशामुळे १० जूनपासूनच इंग्रजांनी भारतातही रविवार हा साप्ताहिक सुट्टीचा वार असेल असे जाहीर केले व रविवारी ‘हॉलिडे’ देण्यास सुरुवात केली.
अनेक संस्थांमध्ये त्यांचे सुट्टीचे वार अन्य दिवशी
सुटीला ‘हॉलिडे’ हा शब्दप्रयोग प्रचलित होण्यामागेही रंजक कहाणी आहे. ख्रिश्चनधर्मीय ब्रिटिशांनी चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जाण्यासाठीचा सोयीचा वार म्हणून रविवार निवडलेला होता. प्रार्थना दिवस हा पवित्र मानला जातो. इंग्रजीत त्याला ‘होली डे’ असे म्हणतात. या ‘होली डे’चा अपभ्रंश होत त्याचा ‘हॉलिडे’ हा शब्दप्रयोग रूढ झाला. आज भारतात सरकारी कार्यालये तसेच बहुतांश कंपन्यांमध्ये रविवारी साप्ताहिक सुट्टी असते. अनेक संस्थांमध्ये त्यांचे सुट्टीचे वार अन्य दिवशीही असतात. ती सुट्टी तेथे काम करणाऱ्या सर्वांना हक्क म्हणून मिळते. पण सुट्टी हाच हक्क आहे व तो मिळावा यासाठी तब्बल सहा वर्षांचे संघर्षमय आंदोलन करत भारतीयांना आठवड्याला एक हक्काची सुट्टी मिळवून देणाऱ्या नारायण मेघाजी लोखंडे या मराठमोळ्या जननायकाचे व १० जून या ‘सुट्टीवाल्या संडे’चे या निमित्ताने स्मरण करणे औचित्यपूर्ण आहे.
- प्रसाद भडसावळे
लेखक संदर्भ ग्रंथपाल व माहिती तज्ज्ञ आहेत.