पुण्यात सप्टेंबर महिन्यात रंगणार " टिकटॉक फेस्टिव्हल"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 12:46 PM2019-08-26T12:46:21+5:302019-08-26T12:52:32+5:30
अगदी सेलिब्रिटींपासून सामान्यांपर्यंत सर्वांनाच टिकटॉक व्हिडिओने वेड लावले आहे.
पुणे : सध्या टिकटॉकची सोशल मीडियावर खूप धूम पाहायला मिळत आहे. अगदी सेलिब्रिटींपासून सामान्यांपर्यंत सर्वांनाच टिकटॉक व्हिडिओने वेड लावले आहे. टिकटॉकबाबत विविध प्रकारच्या सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रिया उमटत असताना सामान्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने पुण्यात सप्टेंबर महिन्यात टिकटॉक फेस्टिव्हल रंगणार आहे. महोत्सवामध्ये पर्यावरण जनजागृती आणि सामाजिक संदेशावर भर देण्यात येणार आहे. २१ सप्टेंबरला घोले रस्त्यावरील नेहरु सांस्कृतिक भवन येथे हा महोत्सव रंगणार आहे.’
आकडेवारीनुसार, टिकटॉक लाँच झाल्यापासून जगात तब्बल १ अब्ज वेळा डाऊनलोड झाले आहे. भारतात १० कोटीपेक्षा जास्त वेळा टिकटॉक डाऊनलोड झाले आहे. शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही हे अॅप्लिकेशन लोकप्रिय आहे. विशेषत:, तरुण-तरुणी विविध विषयांवर टिक-टॉकमधून भाष्य करताना दिसतात. टिकटॉकची जितकी लोकप्रियता आहे, तितकेच हा विषय ट्रोलही होत आहे. काही दिवसांपूर्वी मद्रास उच्च न्यायालयाने टिकटॉक अॅप्लिकेशनवर बंदी घातली आणि नंतर ती उठवण्यात आली. टिकटॉकमधून बरेचदा तरुणाईच्या कलागुणांना वाव मिळतो, तसेच सामाजिक संदेशही दिला जातो. ही लोकप्रियता लक्षात घेऊन साई जनसेवा प्रतिष्ठान आणि एनएस प्रॉडक्शन्सतर्फे या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत आयोजक प्रकाश यादव म्हणाले, ‘अनेक ठिकाणी चित्रपट महोत्सव, लघुपट महोत्सव होतात. त्याचप्रमाणे टिकटॉक फेस्टिव्हलची संकल्पना आम्हाला सुचली. चित्रपट किंवा लघुपटामध्ये लेखक, दिग्दर्शक, निर्माता, कलाकार अशी मोठी टीम असते. टिकटॉकमध्ये सादरीकरण करणारी व्यक्तीच कलाकार, दिग्दर्शक, निर्माता या सर्व भूमिका बजावत असते.
..................
सोशल मीडियाद्वारे व्हिडिओ पाठवा...
४सोशल मीडियाच्या माध्यमातून टिकटॉक व्हिडिओ पाठवण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले. आतापर्यंत ३०० जणांनी व्हिडिओ पाठवले असून यामध्ये लहान मुले, तरुणाई, गृहिणी अशा सर्व वयोगटांतील व्यक्तींचा समावेश आहे. संस्थेला पुण्यासह राज्यभरातून प्रतिसाद मिळतो आहे. ५ सेकंद ते १ मिनिटाचे व्हिडिओ शॉर्टलिस्ट करुन विविध वर्गवारींमध्ये विभागले जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने पर्यावरण जनजागृती, सामाजिक संदेश असलेल्या व्हिडिओंना प्राधान्य दिले जाणार आहे. ३० आॅगस्ट ही व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख आहे.
सामान्यांमधील कलागुणांना वाव मिळावा, यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला. महोत्सवाची घोषणा केल्यावर सुरुवातीला काही नकारात्मक प्रतिक्रिया आल्या. मात्र, आमचा उद्देश स्पष्ट केल्यावर आतापर्यंत खूप मोठा प्रतिसाद मिळाला आहे. - प्रकाश यादव, आयोजक
.....