कात्रज प्राणी संग्रहालयाचे तिकीट आता ऑनलाईन मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2023 09:18 PM2023-11-10T21:18:29+5:302023-11-10T21:18:41+5:30
गेल्या काही वर्षांपासून प्राणिसंग्रहालयात पर्यटकांची गर्दी वाढत होती. दरवर्षी लाखो पर्यटक प्राणिसंग्रहालयात येऊन प्राण्यांना पाहण्याचा आनंद लुटतात.
पुणे : कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात रांगेत उभे राहून तिकिट काढण्याची आता गरज नाही. कारण प्राणी संग्रहालयात आता खास दिवाळी गिफ्ट म्हणून ऑनलाईन तिकीट उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यासाठी खास संकेतस्थळ बनविण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षांपासून प्राणिसंग्रहालयात पर्यटकांची गर्दी वाढत होती. दरवर्षी लाखो पर्यटक प्राणिसंग्रहालयात येऊन प्राण्यांना पाहण्याचा आनंद लुटतात. पण प्राणिसंग्रहालयाच्या तिकिट खिडकीवर प्रचंड गर्दी होत असे. त्यामुळे पर्यटकांची गैरसोय व्हायची. त्यावर उपाय म्हणून आता खास ऑनलाइन तिकीट उपलब्ध करून दिले आहे. घरबसल्या मोबाईलमध्ये तिकीट बूक करता येणार आहे. ते बुकिंग प्रवेशद्वारावर दाखविले की तिथून आत प्रवेश मिळणार आहे. तसेच ऑफलाइन तिकिट काढण्याचा पर्याय देखील असणार आहे. त्यामुळे आता रांगेत उभे राहून तिकिट काढण्याची वेळ पर्यटकांवर येणार नाही.
पर्यटकांची प्रवेशद्वार गर्दी होत असल्याने रस्त्यावर देखील वाहतूक कोंडी होत असे. परंतु त्याचा त्रास देखील आता कमी होणार आहे. पर्यटकांना संकेतस्थळावर जाऊन तिथे तिकिट बूक करून नेट बँकिंग किंवा यूपीआय चा पर्याय निवडून पेमेंट करता येणार आहे. संकेतस्थळावर प्राणीसंग्रहालयाची संपूर्ण माहिती दिली आहे. विविध विभाग केले असून कोणते प्राणी आहेत, भविष्यातील काही योजना असतील तर त्यांची माहिती देखील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
इथे करा नोंदणी...
पर्यटकांनी खालील संकेतस्थळावर जाऊन https://zooticket.pmc.gov.in/ तिकीट बूक करता येऊ शकते. प्राणिसंग्रहालय दर बुधवारी बंद असणार आहे आणि अपंग व्यक्तींना मोफत प्रवेश असणार आहे.
तिकिट घेण्यासाठी खिडकीवर खूप गर्दी होत असे. त्यामुळे पर्यटकांची गैरसोय व्हायची. त्यामुळे आम्ही ऑनलाइनचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. घरबसल्या सर्वांना तिकिट लगेच मिळणार आहे. - डॉ. राजकुमार जाधव, संचालक, राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात, पुणे