बंधाऱ्याचे काम अडचणीत
By admin | Published: June 4, 2016 12:27 AM2016-06-04T00:27:52+5:302016-06-04T00:27:52+5:30
प्रयागधाम व कोरेगाव मूळ (ता. हवेली) या दोन गावांच्या शिवेवर प्रस्तावित असलेला सिमेंट बंधारा मागील सहा महिन्यांपासून वन खात्याच्या तालुकापातळीवरील अधिकाऱ्याच्या आडमुठेपणामुळे प्रलंबित आहे.
उरुळी कांचन : प्रयागधाम व कोरेगाव मूळ (ता. हवेली) या दोन गावांच्या शिवेवर प्रस्तावित असलेला सिमेंट बंधारा मागील सहा महिन्यांपासून वन खात्याच्या तालुकापातळीवरील अधिकाऱ्याच्या आडमुठेपणामुळे प्रलंबित आहे.
कोरेगाव मूळ, प्रयागधाम व नायगाव या तिन्ही गावांच्या परिसरातील ग्रामस्थांच्या पिण्याच्या व जनावरांसाठीच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून जिल्हा परिषदेच्या छोटे पाटबंधारे विभागाच्या वतीने आणि जिल्हा परिषदेचे तत्कालीन उपाध्यक्ष व विद्यमान अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या शिफारशीतून या तीन गावांमध्ये दोन बंधाऱ्यांना मंजुरी देऊन त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी कोरेगाव मूळ येथील बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र, प्रयागधाम सर्वोपचार रुग्णालयाच्या बाजूला वनखात्याच्या राखीव वनक्षेत्र गट ५६८ मध्ये संयुक्त वनव्यवस्थापन समिती कोरेगाव मूळ यांच्यामार्फत वनबंधारा बांधण्याचा ठराव मंजूर झाला आहे.
यासाठी ५६८ गटामधील २ हेक्टरपेक्षाही कमी क्षेत्र वापरले जाणार असल्याने आणि या बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग या वनक्षेत्रामध्ये राहणाऱ्या वन्यप्राणी व पशुपक्षी यांना होणार असल्याने तत्कालीन तालुका वन परिक्षेत्र अधिकारी यांनी ना हरकत दाखला दिलेला होता. प्रशासनाने या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून वैष्णवी कन्स्ट्रक्शन या फर्मला हे काम मंजूर करण्यात आले.
या फर्मने प्रत्यक्षात काम चालू केल्यानंतर वनखात्याच्या नव्याने आलेल्या अधिकाऱ्याच्या अडवणुकीमुळे काम लगेच बंद करण्यात आले. त्यानंतर आतापर्यंत हे काम बंद असल्याने या भागात अडचणीच्या व तीव्र दुष्काळाच्या काळात होणारी पाण्याची सोय होऊ शकली नाही. याला कारण केवळ तालुका वन अधिकारी व जिल्हा परिषदेच्या छोटे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांमधील नसलेला समन्वय होय! शासन एकीकडे जलयुक्त शिवार योजनेच्या कामांना प्राधान्य देत असताना त्याच शासनाचे अधिकारी शासनाच्याच धोरणाला वाटाण्याच्या अक्षदा लावण्याचा प्रकार करतात म्हणजे नेमके काय? असा प्रश्न या भागातील जनतेला पडला आहे. (वार्ताहर)