टायगर आणि लायन्स पॉइंट जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ होणार; ३३३ कोटींच्या प्रस्तावाला मान्यता
By नितीन चौधरी | Published: December 21, 2023 02:53 PM2023-12-21T14:53:39+5:302023-12-21T14:55:01+5:30
लोणावळ्याजवळील हे दोन्ही पॉईंट जोडणारा दरी पूल, साहसी खेळांचा विकास प्रकाश व ध्वनी शो अशा सुविधायुक्त पर्यटन स्थळ विकासाला गती मिळणार
पुणे : लोणावळ्याजवळील कुरवंडे परिसरातील टायगर, लायन्स पॉईट पर्यटन स्थळ विकासाच्या ३३३ कोटी ५६ लाख रुपयांच्या प्रस्तावाला उच्चाधिकार समितीने नुकतीच मान्यता दिली. त्यामुळे या ठिकाणी दोन्ही पॉईंट जोडणारा दरी पूल, साहसी खेळांचा विकास प्रकाश व ध्वनी शो अशा सुविधायुक्त पर्यटन स्थळ विकासाला गती मिळणार आहे. जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ साकारण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. या प्रकल्पाची जबाबदारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
लोणावळ्याजवळील कुरवंडे गावाजवळ टायगर आणि लायन्स पॉईंट या पर्यटन स्थळासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून वन विभागामार्फत गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आराखडा तयार करण्यात येत होता. या प्रकल्पाची जबाबदारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पीएमआरडीएने या पर्यटनस्थळ विकासाच्या दृष्टीने विकास आराखडा करून जिल्हास्तरीय समितीची मान्यता घेण्यात आली. त्यानंतर हा प्रस्ताव राज्य सरकारच्या उच्चाधिकार समितीला पाठविण्यात आला. उच्चाधिकार समितीच्या बैठकीत या ३३३ कोटी ५६ लाख रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता दिली. त्यामुळे लोणावळ्याजवळ जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ विकसित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
लायन्स आणि टायगर पॉईंटला दर शनिवारी, रविवारी सुमारे दहा हजार तर दररोज दोन ते तीन हजार पर्यटक भेट देतात. या परिसराच्या विकासासाठी किमान १५ हेक्टर एवढी जमीन रस्त्यासहित उपलब्ध होण्याची गरज आहे. त्याबाबत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सप्टेंबरमध्ये बैठक घेतली. या ठिकाणी अरुंद रस्ते, उपहारगृह, पाणी सुविधा, वाहनतळ, विद्युत व्यवस्था, माहिती फलक, शौचालय सुविधा तसेच घनकचरा व्यवस्थापन या पर्यटन सुविधांचा सध्या अभाव आहे. त्यामुळेच पवार यांनी प्रस्तावित कामांचा विकास आराखडा तयार कऱण्यासाठी पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल यांना सूचना दिल्या होत्या.
टायगर पॉईंटची प्रस्तावित कामे
- ग्लास स्काय वॉक १२५ मी लांब * ६ मी रुंद
- अँम्फी थिएटर एक हजार व्यक्तींसाठी
- प्रकाश व ध्वनी शो
- लहान मुलांची खेळण्याची जागा
- प्रवेशद्वार व तिकीट घर
- रस्ता रुंदीकरण ४५ मी.
- वाहनतळ – एकूण १५०० कार दोन हजार स्कूटर
- गझिबो २० चौ. मी.एकूण २४
साहसी खेळ
- झिप लाईन -१२५ मी. लांब
- बंजी जम्पिंग
- वॉल क्लाइंबिग
- फेरीस व्हील