वाघ, सिंहांची घेतली जातेय कोरोनापासून काळजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:10 AM2021-05-07T04:10:50+5:302021-05-07T04:10:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : हैदराबाद येथील प्राणिसंग्रहालयातील आठ सिंहांना कोरोना झाल्याचे समेार आले. त्यामुळे कात्रज येथील राजीव गांधी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : हैदराबाद येथील प्राणिसंग्रहालयातील आठ सिंहांना कोरोना झाल्याचे समेार आले. त्यामुळे कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात प्राण्यांची अधिक काळजी घेतली जाऊ लागली आहे.
गेल्या वर्षी न्यूयॉर्क येथील एका वाघाला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते. तेव्हापासूनच प्राणिसंग्रहालयात दक्षता घेतली जात होती, असे संग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव यांनी ‘लोकमत’ला सांगितले. प्राण्यांना मांस उकडून दिले जात आहे, जेणेकरून कोणताही विषाणू त्यात राहणार नाही, असे जाधव म्हणाले.
केंद्रीय पर्यावरण विभागाने हैदराबाद येथील घटनेनंतर देशातील सर्व प्राणिसंग्रहालयांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही केली जात असल्याचेही जाधव म्हणाले. येथील प्राण्यांवर लक्ष ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्राण्यांची विशेष खबरदारी घेतली जात आहे. या प्राण्यांच्या दररोजच्या हालचाली टिपून ठेवल्या जात आहेत. प्राण्यांचा वावर असलेला परिसर निर्जंतुक केला जात आहे.
कात्रज येथील प्राण्यांना दररोज दीड टन खाद्यपदार्थ लागतात. प्राण्यांना खाऊ घालणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले आहे. प्राण्यांच्या खाद्यांना हात लावण्यापूर्वी हॅन्ड ग्लोव्हज वापरणे, फेस मास्क वापरणे, गम बूट वापरणे, हात साबणाने धुणे कर्मचाऱ्यांना अनिवार्य केले आहे. हे सर्व केल्यानंतरच त्यांना प्राण्यांजवळ जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. कर्मचाऱ्यांची वाहने, खाद्यपदार्थ घेऊन येणाऱ्या वाहनांनाही निर्जंतुकीकरण केल्याशिवाय प्राणिसंग्रहालयात प्रवेश दिला जात नाही.
प्राण्यांना हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांचे घरी घालण्याचे कपडे आणि प्राणिसंग्रहालयात घालण्याचे कपडे वेगवेगळे आहेत. प्राणिसंग्रहालयातील कपडे ते घरी घेऊन जात नाहीत, असे सांगण्यात आले.
–----------------------
आपण प्राणिसंग्रहालयात पूर्वीपासूनच दक्षता घेत आहोत. सुमारे ४०० हून अधिक प्राणी आहेत. त्यांची योग्य निगा राखली जात आहे. बाहेरून आल्यावर कर्मचारी त्यांचे पादत्राणे सॅनिटायझरमध्ये ठेवून नंतरच आत जातो. प्राण्यांना अन्न देताना खास गणवेश आणि हातात ग्लोव्हज घातले जातात.
- डाॅ. राजकुमार जाधव, संचालक, राजीव गांधी प्राणिसंग्रहालय, कात्रज
–----------------------