टायगर्स, रॉयल्स, सुपर किंग्ज, एसआरपीए उपांत्यपूर्व फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:18 AM2021-02-21T04:18:34+5:302021-02-21T04:18:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आयसीएआयच्या पश्चिम विभागीय पुणे शाखेच्या वतीने आयोजित आठव्या बीस्मार्ट सीए आंतर फर्म क्रिकेट लीग ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आयसीएआयच्या पश्चिम विभागीय पुणे शाखेच्या वतीने आयोजित आठव्या बीस्मार्ट सीए आंतर फर्म क्रिकेट लीग स्पर्धेत साखळी फेरीत पीएचएम टायगर्स, रॉयल्स, एसआरपीए इलेव्हन, चॅम्प्स सुपर किंग्ज, पेशवा सुपर किंग्ज या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
कटारिया हायस्कूल क्रिकेट मैदान, मुकुंदनगर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत अभिषेक खांबटे याच्या 58 धावांच्या खेळीच्या जोरावर पीएचएम टायगर्स संघाने स्पाय वॉरियर्स संघाचा 54धावांनी पराभव करून दुसरा विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पीएचएम टायगर्स संघाने ८ षटकांत २ बाद ११९ धावांचे आव्हान उभे केले. यात अभिषेक खांबटेने २१ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ५८ धावा व रुद्रांग बेलसरेने २३ चेंडूंत नाबाद ४४ धावांची खेळी केली. याच्या उत्तरात स्पाय वॉरियर्स संघ ८ षटकांत ६ बाद ६५ धावाच करू शकला. यात ऋषभ जैन ३१, राहुल शहा १७ यांनी थोडासा प्रतिकार केला. पीएचएम टायगर्सकडून राजेश मेहता (३-१४), मृगांक साळुंके (२-८)यांनी सुरेख गोलंदाजी केली.
दुसऱ्या सामन्यात कवित पोद्दार (१५ धावा व १-८) याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर चॅम्प्स सुपर किंग्ज संघाने शार्प शूटर्स संघाचा ९ धावांनी पराभव केला. अन्य लढतीत आनंद दायमाच्या नाबाद ४५ धावांच्या जोरावर एसआरपीए इलेव्हन संघाने बीस्मार्ट संघाचा ९ धावांनी पराभव करून दुसरा विजय नोंदविला. कुणाल झामवर (नाबाद ३४ व १-१५) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर रॉयल्स संघाने सीए सुपर किंग्ज संघांचा ८ गडी राखून पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.