जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:13 AM2021-09-19T04:13:05+5:302021-09-19T04:13:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीला बंदी घालण्यात आली असून, सार्वजनिक मंडळे व नागरिकांनी घरात, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीला बंदी घालण्यात आली असून, सार्वजनिक मंडळे व नागरिकांनी घरात, तसेच नगरपालिकांनी उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम हौदामध्ये गणेश विसर्जन करावे. पारंपरिक घाटावर गर्दी करू नये, असे आवाहन पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले आहे.
जिल्ह्यात सर्वत्र शांततेत गणेशोत्सव साजरा करण्यात आला आहे. रविवारी होणाऱ्या गणेश विसर्जनासाठी सर्वत्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी तसेच सार्वजनिक मंडळांनी त्यांच्या परिसरातच गणेश विसर्जन कृत्रिम हौदात करावे, यासाठी सर्वांना सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील नगरपालिकांकडून ठिकठिकाणी कृत्रिम हौद उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नागरिकांनी त्यात गणेश विसर्जन करावे. अनेक गावांमधून जाणाऱ्या नदी, कालव्यांमध्ये पारंपरिक पद्धतीने विसर्जन केले जाते. लाेकांनी गणेश विसर्जनासाठी घाटांवर एकाच वेळी गर्दी करू नये, असे ग्रामस्थांना आवाहन करण्यात आले असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.