कडेकोट बंदोबस्त
By admin | Published: October 16, 2014 06:19 AM2014-10-16T06:19:05+5:302014-10-16T06:19:05+5:30
विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी पिंपरी-चिंचवड शहर व मावळात कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पार पडली.
पिंपरी : विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी पिंपरी-चिंचवड शहर व मावळात कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पार पडली. मंगळवारपासूनच ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात होता. स्थानिक पोलिसांसह अतिरिक्त कुमक मागविण्यात आली होती. संवेदनशील केंद्रांवर अधिकाधिक लक्ष ठेवण्यात आले होते.
मतदान केंद्र असलेल्या इमारतीच्या प्रवेशद्वारावरील पोलीस संशयित व्यक्तीची प्रवेशद्वारात चौकशी करूनच आत सोडत होते. बोगस मतदान होऊ नये यासाठी निवडणूक विभागाचे कर्मचारी खबरदारी घेत होते. मतदारयादीतील नाव, स्लिप, ओळखपत्र तपासूनच मतदानासाठी सोडले जात होते.
राजकीय पक्षांचे बूथ दोनशे मीटर परिसराच्या बाहेर होते. कार्यकर्त्यांना देखील परिसरात मनाई होती. तसेच मतदान केंद्राच्या शंभर मीटर अंतरावरील दुकाने व आस्थापने बंद ठेवली होती.
चारही मतदारसंघांत ७३ मतदान केंदे्र संवेदनशील होती. त्या केंद्रांवर निवडणूक विभागाचे कर्मचारी आणि पोलीस अधिक काळजी घेत होते. या केंद्रांवर मतदानासाठी येणाऱ्या प्रत्येक मतदारांचे छायाचित्र काढले जात होते. मतदान केंद्रात कॅमेरेदेखील बसविण्यात आले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वारंवार भेट दिली जात होती. उमेदवार ज्या भागातील आहे अशा मतदान केंद्रांवरही कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
संपूर्ण शहरात चार ते पाच पथकांमार्फत गस्त घातली जात होती. दोन उपायुक्त, ४ सहायक आयुक्त, १९ पोलीस निरीक्षक, ६५ फौजदार, तसेच पोलीस कर्मचारी आणि गृहरक्षक दलाचे जवान तैनात होते. तसेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, केंद्रीय राखीव दल यासह गुजरात, झारखंड, गोवा राज्याच्या राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात होत्या. शीघ्र कृती दल, दंगा काबू पथकाचाही बंदोबस्त होता.