तुकोबा निघाले पंढरपुरा..!

By admin | Published: June 17, 2017 12:44 AM2017-06-17T00:44:00+5:302017-06-17T00:44:00+5:30

टाळ-मृदंगाचा निनाद, वीणेचा झंकार, ‘ज्ञानोबा-तुकोबा’चा गजर आणि हाती भगव्या पताका घेतलेल्या हजारो वारकऱ्यांची उपस्थिती अशा अत्यंत भक्तीमय

Tikoba leaves Pandharpura ..! | तुकोबा निघाले पंढरपुरा..!

तुकोबा निघाले पंढरपुरा..!

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क

देहूगाव (पुणे) : टाळ-मृदंगाचा निनाद, वीणेचा झंकार, ‘ज्ञानोबा-तुकोबा’चा गजर आणि हाती भगव्या पताका घेतलेल्या हजारो वारकऱ्यांची उपस्थिती अशा अत्यंत भक्तीमय वातावरणात जगद््गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे शुक्रवारी सायंकाळी देहूतून पंढरीकडे प्रस्थान झाले.
‘‘संपदा सोहळा नावडे मनाला
करी ते टकळा पंढरीचा,
जावे पंढरीशी आवडी मनासी
कधी एकादशी आषाढी हे,
तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी
त्याची चक्रपाणी वाट पाहे.’’
सावळ्या विठूरायाच्या भेटीची आर्त आस मनी ठेवून हाती भगव्या पताका घेऊन लाखो वैष्णवांचा मेळा पंढरीची वाट चालू लागला आहे.
प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने पहाटे साडेचारला शीळा मंदिरात सुनील मोरे व विठ्ठल मोरे, विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात संस्थानाचे अध्यक्ष पंढरीनाथ मोरे व अभिजित मोरे, जालिंदर मोरे व अशोक मोरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.
७ वाजता पालखीसोहळ्याचे जनक नारायण महाराजांच्या समाधीची महापूजा, सकाळी १०ला संभाजी महाराज मोरे देहूकर यांनी कीर्तन केले.
सकाळी ९च्या सुमारास म्हसलेकर मंडळी श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका आणण्यासाठी म्हातारबुवा दिंडी व मानकरी गंगा म्हसलेकर हे भालचंद्र घोडेकर आणि कुटुंबीयांच्या वाड्यात दाखल झाले. येथे अभंग आरती झाल्यानंतर म्हसलेकरांनी या पादुका डोक्यावर घेऊन इनामदारवाड्यात आणल्या. येथे पादुकांची विधीवत पूजा दिलीपमहाराज मोरे गोसावी यांच्या हस्ते झाली. काल्याचे कीर्तन झाल्यानंतर आणि इनामदारवाड्यातील पूजेनंतर पादुका पालखीचे मानकरी म्हसलेकर मंडळींच्या ताब्यात देण्यात आल्या. त्यांनी म्हतारबा दिंडीसह या पादुका भक्तीमय वातावरणात मुख्य मंदिरातील भजनी मंडपात आणल्या.
त्यानंतर दुपारी पावणेतीनला प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झाली. सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार संजय भेगडे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते पादुकांची महापूजा करण्यात आली. आरतीनंतर सोहळ्यातील मानकरी, सेवेकरी, दिंडेकऱ्यांचा नारळ प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर पादुका मोहक फुलांनी सजविलेल्या पालखीत ठेवण्यात आल्या. ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल...’ असा जयघोष झाला. तुतारी वाजली, टाळ-मृदंगाच्या गजराने आसमंत दणाणला. त्यानंतर देहूतील तरुणांनी पालखी खांद्यावर घेतली आणि सायंकाळी साडेचारला वीणा मंडपातून पालखी बाहेर आली. या वेळी पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली होती. त्यानंतर मंदिर प्रदक्षिणा होऊन सोहळा पंढरीकडे मार्गस्थ झाला.
चोपदार नामदेव गिराम कानसुलकर, नारायण खैरे, देशमुख चोपदार व सेवेकरी तानाजी कळमकर, कांबळे यांच्यासह सर्व मानकऱ्यांना व सेवेकरी मंडळींना संस्थानच्या वतीने नारळ प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला. आज सोहळा गावातील इनामदारवाड्यात मुक्कामास राहणार असून, शनिवारी सकाळी सोहळा आकुर्डीतील मुक्कामाकडे मार्गस्थ होईल.
पाऊस अजून समाधानकारक झालेला नाही त्यामुळे पेरणीची कामे अपूर्ण असल्याने वारीतील गर्दीवर काहीसा परिणाम जाणवत आहे. मात्र तरुण आणि महिलांचा सहभाग लक्षणीय आहे.

देहूनगरीतून हरित वारी
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे... पक्षीही सुस्वरें आळविती... या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगावर आजच्या काळात कृती करीत पर्यावरण रक्षणाकरिता संपूर्ण महाराष्ट्रात ५० लाख वृक्ष लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यानुसार जय गणेश हरित वारीचा श्रीगणेशा देहूनगरीतून शुक्रवारी झाला. इंद्रायणीच्या तीरावर वृक्षारोपण करून वारकरी मंडळींनी ‘एकच लक्ष, देशी वृक्ष’ असा नारा दिला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरु ण मंडळातर्फे देहूमधील वैकुंठस्थान गोपाळपुरा येथे जय गणेश हरित वारीला प्रारंभ करण्यात आला.

संत ज्ञानेवर महाराजांच्या पालखीचे आज प्रस्थान
श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा उद्या शनिवारी आळंदीतून पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवणार आहे. पहाटे ४पासून प्रस्थान सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. यासाठी लाखो वारकरी अलंकापुरीत दाखल झाले आहेत.

सोहळ्याची वैशिष्ट्ये ...
- सीसीटीव्हीची नजर
- चोख पोलीस बंदोबस्त
- सेवाभावी संस्थांतर्फे सेवा
- वारकऱ्यांना सोहळा अनुभवता यावा यासाठी स्क्रीनची व्यवस्था
- वाहतुकीत बदल
- तरुण आणि महिलांचा सहभाग लक्षणीय
- शेतीची कामे पूर्ण न झाल्याने
गर्दीवर परिणाम

Web Title: Tikoba leaves Pandharpura ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.