तुकोबारायांच्या पादुकांना नीरास्नान
By admin | Published: June 30, 2017 03:36 AM2017-06-30T03:36:12+5:302017-06-30T03:36:12+5:30
संतश्रेष्ठ तुकाराममहाराज पालखीच्या सराटी मुक्कामानंतर आज सकाळी ७ वाजता तुकोबांच्या पादुकांना नीरा नदीपात्रात उत्साही वातावरणात स्नान घालण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बावडा :जाता पंढरीसी सुख वाटे जीवा ।आनंदे केशवा भेटताची ।।
संतश्रेष्ठ तुकाराममहाराज पालखीच्या सराटी मुक्कामानंतर आज सकाळी ७ वाजता तुकोबांच्या पादुकांना नीरा नदीपात्रात उत्साही वातावरणात स्नान घालण्यात आले. गेली तीन-चार वर्षे नदीपात्र कोरडे असल्याने स्नानासाठी टँकरचा आधार घ्यावा लागला. यांदा पावसाने पालखीपूर्वीच हजेरी लवल्यानने सराटी बंधाऱ्यात बऱ्यापैकी पाणी उपलब्ध झाले. स्नानाच्या ठिकाणीही पाणी साचल्याने उत्साही वातावरणात पादुका स्नान झाले.
रात्री सराटी गावी मुक्कामी पालखी सोहळा असल्याने भजन, कीर्तन, भारूड व टाळमृदंगाचा गजर यांमुळे नदीकाठचा परिसर दुमदुमून गेला होता.
सकाळी पादुका स्नानानंतर विधिवत पूजा करून पालखी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली. पुणे जिल्ह्याचा निरोप घेऊन नीरेवरील पूल ओलांडून पलीकडे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला.
जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, राजाभाऊ जगदाळे, सुरेश जगदाळे, महेश जगदाळे आदी गावच्या प्रमुखांनी इंदापूर पंचायत समितीचे सभापती करणसिंह घोलप, उपसभापती देवराज जाधव, गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले, तहसीलदार श्रीकांत पाटील, प्रांताधिकारी हेमंत निकम, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर यांनी पालखीला निरोप देऊन अकलूज हद्दीत पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सोलापूरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारूड, माळशिरसचे आमदार हनुमंत डोळस, आमदार रामहरी रूपनवर, बाजार समितीचे मदनसिंह मोहिते-पाटील, माळशिरस पं.स. सभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील, विधान परिषदचे सभापती माणिकराव ठाकरे यांच्याकडे सुपूर्त केली. त्यांनी स्वागत केले.