तुकोबांच्या पादुकांना यंदाही टँकरच्या पाण्याने स्नान?
By admin | Published: July 6, 2016 03:14 AM2016-07-06T03:14:07+5:302016-07-06T03:14:07+5:30
दुष्काळामुळे मागील तीन वर्षांपासून नीरा नदी खळाळलीच नाही. त्यामुळे तुकोबांच्या पादुकांना टँकरच्या पाण्याने स्नान घालावे लागले
बावडा : पांडुरंगा औंदा तरी
नीरेला पाणी येऊ दे!,
तुकोबाच्या पादुकांना
वाहत्या गंगेत न्हाऊ दे!
असे साकडे बावडा व सराटी परिसरातील भाविकांनी विठ्ठलाला घातले आहे. दुष्काळामुळे मागील तीन वर्षांपासून नीरा नदी खळाळलीच नाही. त्यामुळे तुकोबांच्या पादुकांना टँकरच्या पाण्याने स्नान घालावे लागले. यंदा पावसाला चांगली सुरुवात झाली; मात्र अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे निरेला पाणी नाही.
पालखी सराटीत येण्यासाठी काही दिवस उरले आहेत. सध्या नीरा नदी कोरडी आहे. बंधाराही पूर्ण कोरडा पडला आहे. अशा अवस्थेत वारकऱ्यांची कशी सोय होणार, असा प्रश्न पुन्हा सराटीकरांना पडला आहे. संतश्रेष्ठ तुकोबारायांची पालखी ६ जुलैला इंदापूर तालुक्यात प्रवेश करणार असून, ९ जुलै रोजी इंदापूरचा मुक्काम आटोपून पालखी संध्याकाळी सराटी गावातील नीरेकाठी मुक्कामासाठी थांबणार आहे. पुणे जिल्ह्यातील हा शेवटचा मुक्काम असतो, त्यानंतर ही पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करते. पर्जन्यमान घटल्यामुळे तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे मागील तीन वर्षे या नदीला पाणी येत नसल्याने कधी डोक्यावरून आणलेल्या हंड्याने, तर कधी टँकरने पादुकांना स्नान घालावे लागले. यंदा तरी नीरा नदीला पाणी यावे व पादुकांना वाहत्या पाण्यात स्नान मिळावे, यासाठी भाविक विठ्ठलाची आराधना करीत आहेत. तुकोबांच्या पालखीच्या स्वागताची ठिकठिकाणी जय्यत तयारी सुरू आहे. तहसीलदार वर्षा लांडगे यांनी नुकतीच शासकीय अधिकारी व पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन स्वागताची तयारी करण्याबाबत मार्गदर्शन केले आहे. (वार्ताहर)
इंदापूर बांधकाम उपविभागामार्फत इंदापूर ते सराटी या पालखी मार्गावर काटेरी झुडपे काढणे, साईडपट्ट्या भरणे, खड्डे बुजवणे इ. कामे हाती घेतली असल्याची माहिती सहायक अभियंता लक्ष्मीकांत जाधव यांनी दिली.
बावडा गावातही पालखी स्वागताची जय्यत तयारी करण्यात येत आहे, अशी माहिती सरपंच स्मिता पाटील, उपसरपंच अमोल घोगरे, ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे यांनी दिली.