Tiktok स्टार गुलीगत म्हणतो राष्ट्र प्रथम; मोदींच्या निर्णयाचं स्वागतच!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 10:39 AM2020-07-02T10:39:42+5:302020-07-02T13:14:20+5:30
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मोरटी मुर्वे गावचा सुरज चव्हाण उर्फ गुलीगत हा टीकटॉकवरचा मराठी स्टार सेलिब्रिटी आहेत.
मुंबई - भारतात टिकटॉकनं अनेकांना प्रसिद्धी दिली, कित्येकांना एखाद्या सेलिब्रिटीसारखं वलय मिळवून दिलं. गावचं टॅलेंट जगभर पोहोचण्यास टीकटॉकने मोठी मदत केली. त्यामुळेच, गाव-खेड्यातील मुलेही टीकटॉक स्टार म्हणून मिरवू लागले, त्यांना उत्पन्नाचा नवा मार्ग टीकटॉकने दिला. मात्र, केंद्र सरकारनं घेतलेल्या एका निर्णयानं टिकटॉक स्टार चिंतेत आहेत. टिकटॉक बंद झालं. आता पुढे काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तरीही, राष्ट्र प्रथम म्हणत टीकटॉक स्टार गुलीगतने टीकटॉक बंदीचं समर्थन केलंय. भलेही टीकटॉकने मला फेमस केलं, मोठं केलं, पण राष्ट्रहित महत्त्वाचं असल्याचं गुलीगतने म्हटलंय.
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मोरटी मुर्वे गावचा सुरज चव्हाण उर्फ गुलीगत हा टीकटॉकवरचा मराठी स्टार सेलिब्रिटी आहे. गुलीगतचे टीकटॉकवर तब्बल 15 लाख फॉलोवर्स असून तो दररोज टीकटॉकच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांचं मनोरंजन करतो. त्यासोबतच टीकटॉक हे त्याच्या उदरनिर्वाहाचं साधन असून त्याला दिवसाला १ हजार रुपये तरी मिळत असत. मात्र, केंद्र सरकारच्या एका निर्णयानं सुरज चव्हाणचं दैनिक कामचं बंद झालंय. विशेष म्हणजे गुलीगत हा परिस्थितीने अत्यंत गरीब असून लहानपणीच त्याच्या आई-वडिलांचे निधन झाले आहे. गुलीगतला 5 बहिणी असून त्यापैकी 4 बहिणींचे लग्न झाल्याचे गुलीगतने म्हटले, अद्याप एका बहिणीचं लग्न करायचं आहे. सध्या, गावाकडे नुकतेच त्याने घराचे बांधकाम सुरु केले होते. टीकटॉकच्या माध्यमातून त्याला मदतही मिळत होती. मात्र, अचानक टीकटॉक बंदीचा निर्णय झाला अन् त्याला मिळणारी मदतच बंद झाल्याचं दिसून येतंय. सरकारच्या निर्णयाने गुलीगतला मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. तरीही राष्ट्रप्रथम म्हणत मोदींच्या निर्णयाचे स्वागतच सुरज चव्हाण याने केले आहे.
टीकटॉकने धोका दिलाय, पहिलं टॉकटॉक सुरु होतं तेव्हा कुठंही ओपनिंगला वगैरे जात होतो. पण, आता हे सगळं बंद झालय. गेल्या वर्षातील हा पहिलाच दिवस असेल की मी टॉकटॉक व्हिडिओ बनवला नाही, असे अतिशय भावनिका होऊन गुलीगतने म्हटलंय.
गुलीगत बँड इज बँड
बुक्कीत टेंगुळ गुलीगत...
सुरज चव्हाणचा हा फेमस डायलॉग असून आजही तो आपल्या चाहत्यांच्या विनंतीला मान देत, फेसबुक किंवा व्हिडिओच्या माध्यमातून हा डायलॉग परफॉर्मन्सद्वारे म्हणून दाखवत आहे. टीकटॉक बंद झाल्याचं दु:ख असून डोळ्यात पाणी येतंय. मात्र, टीकटॉक बंद झालं तरी आता युट्यूबवर आपण लाटा करू.. लाटा.. कसं गुलीगत. बँड इज बँड... सुरज चव्हाण लय बेक्कार... बुक्कीत टेंगुळ असेही तो आपलं दु:ख मनात ठेऊन हसत हसत म्हणतोय. सर्वसामान्य कुटुंबातील सुरज चव्हाणच्या कमाईचं साधन टीकटॉक होते, पण आता टीकटॉक बंद झाल्याने तो बेरोजगार झाला आहे. पातळ बांध्याचा, अंगावर स्टाईलीश कपडे परिधान करणारा, हेअर स्टाईलमध्ये चॉकलिटी रंगाच्या केसांचा हटके कट मारलेला आणि आपल्या फुल्ल कॉन्फिडेन्सवर जगणारा गुलीगत आता, टीकटॉकच्या स्पर्धेतील अॅपची वाट पाहतोय, त्यावर पुन्हा सक्रीय होण्याचा विचार करतोय.
दरम्यान, धुळ्यात राहणारे दिनेश पवारदेखील टिकटॉकमुळे प्रसिद्धीच्या झोतात आले. दोन पत्नींसह टिकटॉक व्हिडीओ करणाऱ्या दिनेश पवार यांना सरकारनं घेतलेल्या बंदीच्या निर्णयामुळे धक्का बसला. आम्ही उद्ध्वस्त झालो. टिकटॉकवरील बंदीची बातमी ऐकून माझ्या दोन्ही बायका अक्षरश: ढसाढसा रडल्या, अशा शब्दांमध्ये पवार यांनी त्यांच्या भावना बोलून दाखवल्या. धुळे जिल्ह्यात राहणारे दिनेश पवार टिकटॉवर अतिशय प्रसिद्ध होते. त्यामुळे सरकारच्या निर्णयामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. 'आम्ही उद्ध्वस्त झालो. मात्र आमच्या बाबतीत हा प्रकार घडलेला नाही, याची आम्हाला कल्पना आहे. टिकटॉकवरील बंदीची बातमी पाहून माझ्या दोन्ही बायका ढसाढसा रडल्या. या निर्णयामुळे आमच्यासारखेच लाखो जण दुखावले गेले आहेत,' असं पवार म्हणाले. आता यूट्यूबकडे जाण्याचा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.