वाहत्या टिळक रोडवर जेव्हा अंधार होतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 08:04 PM2018-04-19T20:04:32+5:302018-04-19T20:04:32+5:30
वातावरण ढगाळ झाले की पावसाची चाहूल घेऊन येणारे कीटक फिरायला लागतात. विशेषतः संध्याकाळच्या वेळी हे कीटक अचानक बाहेर येतात.जोरदार पाऊस पडून गेला की गायब होतात.
पुणे : पुण्यातले काही रस्ते दिवसभर गर्दीने व्यापलेले असतात. या रस्त्यांवर कधीही शांतता नसते आणि अंधारसुद्धा !पण हा टिळक रस्ता गेले दोन दिवस रात्री ७ ते ९ या वेळात अंधारलेला असतो याचे कारण आहे कीटक . पुणे शहरात सध्या असलेल्या वातावरणामुळे टिळक रस्त्यावर पाकोळीसारख्या कीटकांचे प्रमाण प्रचंड वाढले असून त्यामुळे टिळक रस्त्यावरच्या दुकानदारांना दुकानातले दिवे बंद ठेववे लागत आहेत.
वातावरण ढगाळ झाले की पावसाची चाहूल घेऊन येणारे कीटक फिरायला लागतात. विशेषतः संध्याकाळच्या वेळी हे कीटक अचानक बाहेर येतात.जोरदार पाऊस पडून गेला की गायब होतात. याच कारणामुळे पुण्यातही हे कीटक वाढले आहेत. इतकेच नव्हे तर टिळक रस्त्यावर संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत कीटक थैमान घालत असून जिथे प्रकाश दिसेल त्या ठिकाणी घोळक्याने फिरतात. त्यामुळे बहुतांश दुकानदार दुकानातले दिवे बंद करत असून कामासाठी एखाद्याने जरी दिवा लावला तरी हे कीटक विळखा घालत असल्याचा अनुभव त्यांना येत आहे. जोवर पाऊस होत नाही किंवा हवा स्वच्छ होत नाही तोवर हा प्रकार कायम असणार असून तोवर संध्याकाळी टिळक रस्ता अंधारात गेलेला दिसणार आहे. या भागातले दुकानदार राम पाखरे यांनी लोकमतशी बोलताना हे कीटक चावत नसले आजूबाजूला घोटाळत असल्याने काम करणे अवघड जात असल्याचे सांगितले. गंमत म्हणजे फक्त दोन तास त्रास होत असून बाजारातील कोणताही स्प्रे मारला तरी काहीही फरक पडत नसल्याचा अनुभव त्यांनी सांगितला.