टिळकांचा आदर्श; मात्र नियम डावलून
By Admin | Published: April 1, 2017 02:35 AM2017-04-01T02:35:17+5:302017-04-01T02:35:17+5:30
महापालिका शिक्षण मंडळातील विद्यार्थ्यांना शुक्रवारी दुपारी गणेश कला क्रीडा मंच येथे लोकमान्य, एक युगपुरुष
पुणे : महापालिका शिक्षण मंडळातील विद्यार्थ्यांना शुक्रवारी दुपारी गणेश कला क्रीडा मंच येथे लोकमान्य, एक युगपुरुष हा चित्रपट दाखवण्यात आला, मात्र विद्यार्थ्यांना असा चित्रपट दाखवण्यासाठी असलेले महापालिकेचे सर्व नियम त्यासाठी डावलण्यात आले. महापौर मुक्ता टिळक यांच्या केवळ तोंडी आदेशाने हा चित्रपट दाखवण्यात आला असा आरोप विरोधी पक्षांच्या वतीने करण्यात आला. महापौरांनी मात्र हा कार्यक्रम पूर्वनियोजित होता, निवडणूक आचारसंहितेमुळे लांबणीवर पडला, असा खुलासा केला.
सुमारे अडीच हजार विद्यार्थी चित्रपटासाठी गणेश कला क्रीडा मंच येथे आणण्यात आले होते. मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी असा काही कार्यक्रम करायचा असेल व त्यातही तो खर्चिक असेल तर त्यासाठी अनेक परवानग्या, विषयमंजुरी वगैरे सव्यापसव्य करावे लागतात. आर्थिक बाबींचा समावेश असलेले उपक्रम राबवण्यासाठी मंडळाची तसेच पालिकेचीही विशेष नियमसंहिता आहे. हा चित्रपट दाखवण्यासाठी मात्र महापौरांचा केवळ तोंडी आदेश मानण्यात आला असे काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांचे म्हणणे आहे.
महापालिका वर्षभरात अनेक राष्ट्रपुरुषांची जयंती साजरी करीत असते. त्यासाठी खर्चही केला जातो, पण प्रत्येक वेळी नियम पाळले जातात. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ या लोकमान्य टिळक यांच्या सिंहगर्जनेचे हे शताब्दी वर्ष आहे. ते साजरे करण्यासाठी महापालिकेने सन २०१६-१७च्या अंदाजपत्रकात ५ लाख रुपयांची तरतूद केली होती, पण ही तरतूद कार्यक्रमांसाठी होती, चित्रपटासाठी नाही. आता महापालिका सर्वच थोर राष्ट्रपुरुषांचे चित्रपट विद्यार्थ्यांना दाखवणार का, असा सवाल शिंदे यांनी केला. चित्रपट दाखवला त्याबद्दल आक्षेप नाही, मात्र तो नियम डावलून केवळ तोंडी आदेशावर दाखवला हे चूक आहे असे ते म्हणाले.