सिंहगडच्या २२ महाविद्यालयांचे प्रवेश रोखले, येत्या शैक्षणिक वर्षापासून कार्यवाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 01:10 AM2018-02-09T01:10:54+5:302018-02-09T01:10:56+5:30
सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या २२ महाविद्यालयांमधील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचा-यांचे वेतन अदा करण्याचे आदेश पाळण्यात संस्थेला अपयश आल्याने अखेर अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) त्यांच्या सर्व २२ आभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयांमधील प्रथम वर्षाचे प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे : सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या २२ महाविद्यालयांमधील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचा-यांचे वेतन अदा करण्याचे आदेश पाळण्यात संस्थेला अपयश आल्याने अखेर अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) त्यांच्या सर्व २२ आभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयांमधील प्रथम वर्षाचे प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे वडगाव, नºहे, कोंढवा, वारजे, लोणावळा, सोलापूर आदी ठिकाणी २२ आभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांमध्ये ३ हजार प्राध्यापक व ५ हजार शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्व कर्मचाºयांचे १५ महिन्यांपासून वेतन रखडले आहे. या पार्श्वभूमीवर एआयसीटीईकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार ३१ जानेवारी २०१८च्या आत शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाºयांचे वेतन अदा करण्याचे निर्देश एआयसीटीईने दिले होते; मात्र त्याचे पालन करण्यात सिंहगड संस्थेला अपयश आल्याने अखेर त्यांच्या सर्व २२ महाविद्यालयांमधील प्रवेशाचा इंटक शून्य करण्याचा निर्णय एआयसीटीईने घेतला असून, त्याबाबतचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार राज्याच्या तंत्र शिक्षण संचालनालयाकडून येत्या शैक्षणिक वर्षापासून प्रथम वर्षाचे प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाºयांचे वेतन आॅक्टोबर २०१६ पासून रखडले आहे. त्यामुळे त्यांना दैनंदिन खर्च, दवाखाना, घरभाडे किंवा बँकेचे हप्ते कसे भरायचे, असे प्रश्न या शिक्षकांपुढे आहेत. त्यामुळे त्यांना मोठ्या कुचंबणेचा सामना करावा लागत आहे. एआयसीटीईच्या निर्णयानंतर तरी ३१ जानेवारीपर्यंत वेतन जमा होईल, अशी अपेक्षा शिक्षकांना होती; मात्र तीदेखील फोल ठरली आहे.
एआयसीटीईने घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आता धर्मादाय आयुक्त कार्यालयाने संस्थेवर प्रशासक नेमून महाविद्यालयांचा कारभार सुरळीत करावा, अशी अपेक्षा शिक्षकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर, शिक्षकांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. तीत न्यायालयाकडून दिलासा मिळू शकेल, अशी अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.
>सध्या शिकणाºया विद्यार्थ्यांचे काय ?
एआयसीटीईने येत्या शैक्षणिक वर्षापासून प्रथम वर्षासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नयेत, असा निर्णय घेतला आहे. मात्र, सध्या द्वितीय, तृतीय वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे काय? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
शिक्षकांनी अनेक दिवसांपासून असहकार आंदोलन पुकारलेले आहे. त्यामुळे संस्थेचा पुढील दैनंदिन कारभार सांभाळण्यासाठी प्रशासक नेमावा किंवा शिक्षकांच्या समितीला महाविद्यालय चालविण्यास द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
>एआयसीटीईच्या
निर्णयाची अंमलबजावणी
एआयसीटीईने सिंहगड संस्थेच्या २२ महाविद्यालयांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशाचा इंटक शून्य करण्याचा निर्णय घेतला आहे. तंत्र शिक्षण संचालनालयाकडून येत्या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल.
- अभय वाघ, संचालक,
तंत्र शिक्षण विभाग