कष्टकऱ्यांचे ‘हालसत्र’थांबेना...
By admin | Published: November 11, 2016 01:53 AM2016-11-11T01:53:46+5:302016-11-11T01:53:46+5:30
बँका सुरू झाल्या तशी चाकरमान्यांनी व सामान्यांनी बँकेकडे धाव घेतली आणि दिलासा मिळविला; पण ज्यांचे बँकेत खातेच नाही अशा गरिबांचे काय..?
पुणे : बँका सुरू झाल्या तशी चाकरमान्यांनी व सामान्यांनी बँकेकडे धाव घेतली आणि दिलासा मिळविला; पण ज्यांचे बँकेत खातेच नाही अशा गरिबांचे काय..? धुणीभांडी करणाऱ्या महिला, सफाई कर्मचारी, कष्टकरी महिला अशा अनेकांचे हाल आजही सुरूच राहिले.
चलनातून ५०० व १०००च्या नोटा बंद झाल्या, या निर्णयाची फारशी माहिती नसल्याने व बँकेत अनेकांची खाती नसल्याने कष्टकऱ्यांना आजही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
अनेक घरांत जाऊन मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या महिलांचे उत्पन्न कमी असल्याने त्यांचे बँक खाते नाही. पगारही रोखीने मिळतो. अशा परिस्थितीत त्यांच्यापुढे प्रश्न निर्माण झाले. त्यांचे अनेकदा बँक खाते नसते, तसेच घरकाम करणाऱ्या मोलकरणींना पगारही रोखच दिला जातो. त्यामुळे अनेक महिलांची व कष्टकरी वर्गाची दैनंदिन व्यवहार करताना मोठी अडचण झाली.
बँकेत पैसे बदलून मिळतील इतकेच ठाऊक असणाऱ्या कष्टकऱ्यांनी पैसे बदलून मिळतील म्हणून धाव घेतली खरी; परंतु नोटा बदलून घेण्यासाठी ओळखपत्राची
आवश्यकता असल्याचे अनेकांना माहीत नसल्याने रिकाम्या हाताने परतावे लागले. घरकाम करणाऱ्या महिलांनी पाचशे-हजाराच्या नोटा बदलून देण्याची विनंती आपल्या मालकांकडे केली. त्यांचेही हात बांधलेले असल्याने काहींनी घरखर्चासाठी कामाच्या ठिकाणाहून काही रक्कम उसनी घेतली. बँकेच्या व्यवहाराची पुरेशी माहिती नसणाऱ्या घरकाम करणाऱ्या महिलांमध्ये या निर्णयाने संभ्रमाचे वातावरण होते. या महिला आपण काम करीत असलेल्या ठिकाणी मालकिणीलाच ‘बाई या नोटा सुट्या करून द्याल का हो?’ अशी विनंती करीत होत्या. बँक व्यवहाराबाबत पुरेसे ज्ञान नसणाऱ्यांची अशा प्रकारे अडचण झाल्याचे चित्र होते.(प्रतिनिधी)