शालेय अभ्यासक्रमावरील “टिलीमिली” मालिकेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:19 AM2021-02-06T04:19:21+5:302021-02-06T04:19:21+5:30
पुणे : ‘एमकेसीएल नॉलेज फाऊन्डेशन’ या पुण्यातील स्वयंसेवी संस्थेने पहिली ते चौथी इयत्तांच्या दुसऱ्या सत्राच्या सर्व विषयांचे मराठी ...
पुणे : ‘एमकेसीएल नॉलेज फाऊन्डेशन’ या पुण्यातील स्वयंसेवी संस्थेने पहिली ते चौथी इयत्तांच्या दुसऱ्या सत्राच्या सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवर “टिलीमिली” या दैनंदिन मालिकेद्वारे मोफत देण्याचे ठरविले आहे. आता पहिले ते चौथीसाठीचा अभ्यासक्रम सोमवारपासून (दि. ८) सुरू होत आहे.
महाराष्ट्राच्या महानगरांपासून तर आदिवासी पाड्यांपर्यंत राहणाऱ्या लक्षावधी शालेय विद्यार्थ्यांनी, पालकांनी व शिक्षकांनी या मालिकेच्या पहिल्या सत्रातील दैनंदिन प्रसारणाचा लाभ जुलै ते सप्टेंबर २०२० या काळात घेतला होता. आता दुसऱ्या सत्रातही या नि:शुल्क सेवेचा लाभ राज्यात सर्वदूर राहणाऱ्या लक्षावधी ‘टिली व मिली’ अर्थात मुले व मुली त्यांच्या घरच्या, शेजारच्या किंवा परिसरातल्या दूरचित्रवाणी संचावर सोमवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२१ पासून रोज घेऊ शकतील. ही मालिका मुलांसोबत पालकांनी व शिक्षकांनीही पहावी असे आवाहन आम्ही करीत आहोत. या मालिकेत रोज सुचवले जाणारे शैक्षणिक उपक्रम मुले त्याच दिवशी पालकांबरोबर घरी व परिसरात करून त्यातून शिकण्याचा आनंद घेऊ शकतील. “टिलीमिली” मालिका ‘बालभारती’च्या पहिली ते चौथी इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांतील दुसऱ्या सत्राच्या पाठांवर व त्यातील संकल्पनांवर आधारित आहे.
पहिली ते चौथी या इयत्तांचे मिळून दुसऱ्या सत्रातील शालेय अभ्यासक्रमाचे एकूण १९२ (प्रत्येक इयत्तेचे ४८) एपिसोड्स असलेली ही महामालिका रविवार वगळता २४ दिवस रोज प्रसारित केली जाईल. ती सोमवार, दिनांक ८ फेब्रुवारी २०२१ रोजी सुरू होत असून ती शनिवार, दिनांक ६ मार्च २०२१ रोजी समाप्त होईल.