पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ, सांडपाण्यामुळे पाणी प्रदूषित
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 11:41 PM2018-11-13T23:41:37+5:302018-11-13T23:42:25+5:30
सांडपाण्यामुळे पाणीसाठे प्रदूषित : जलप्रदूषणामुळे महामार्गानजीकचे नागरिक हवालदिल
सासवड : आळंदी ते पंढरपूर (मंगळवेढा) हा रस्ता राष्ट्रीय महामार्गावरील काळेवाडी (ता. पुरंदर) येथे मोठ्या प्रमाणावर हॉटेल व्यवसायाच्या वाढत्या सांडपाण्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या विहिरींचे पाणी दूषित होत आहे. सोडण्यात येणारे सांडपाणी व स्वच्छतागृहातील पाणी एकत्रित सोडून दिले जात आहे, या पाण्यामुळे ओढे-नाले व विहिरी यांचे पाणीसाठे प्रदूषित होत आहेत.
शेतजमिनीही काही काळानंतर नापीक होण्याची भीतीही शेतकरी व्यक्त करीत आहेत. पाणी पिण्यायोग्य व वापरण्यास उपयोगी नसल्याचे दिसून येत आहे. पाळीव जनावरे असे पाणी अनवधानाने पीत असल्याने भविष्यात कोणत्या रोगाला बळी पडतील हे सांगता येत नाही. परिसरातील नागरिकांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे, दुष्काळी परिस्थितीत हा वाढीव खर्च नाइलाजाने करावा लागत आहे.
महामार्गाच्या कडेला असलेल्या नागरिकांनी याबाबत स्थानिक ग्रामपंचायती, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी व प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत; मात्र कागदी घोडे नाचविण्यापलीकडे कारवाई होत नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे. पुरंदरमध्ये यावर्षी दुष्काळाची दाहकता जास्त आहे, यास्थितीत पिण्याच्या पाण्याची मागणी कमी होईल हा प्रयत्न केला पाहिजे; मात्र प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारींकडे काणाडोळा करण्याचे काम चालविले आहे, परिणामी नागरिकांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे.
सांडपाणी व स्वच्छतागृहातील पाणी एकत्रित करून, त्याचा पुनर्वापर करण्यासाठी कमी खर्चात करता येणारी मैलापाणी प्रक्रिया सयंत्र उभारणी करण्याची सक्ती हॉटेल व्यावसायिकांना प्रशासनाने केली पाहिजे, हे प्रक्रिया केलेले पाणी शेतीसाठी वापरता येईल. पुढील वर्षीच्या पावसाळ्यापर्यंत पिण्याच्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे, त्यादृष्टीने आहेत ते पाणीसाठे जपण्याचे काम प्रशासकीय व्यवस्थेने गांभीर्याने करावे, अशी मागणी या भागातील शेतकरी व सांडपाणीबाधित विहिरीचे मालक बाळासाहेब सखाराम झेंडे व इको फाउंडेशनचे संचालक तानाजी सातव यांनी केली आहे.